Monday, June 8, 2015

पीत पुरोगाम्यांनी जात दाखवली!

महाराष्ट्रातील (कु)प्रसिद्ध पत्रकार निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी नामक कोणा व्यक्तीमधील संभाषण सध्या व्हाटस अॅप, फेसबुक आणि ट्विटरवरून गाजत आहे. वागळेंनी ब्राह्मण जातीतील लोकांना 'ठोक के भाव' में खूनी आणि दंगेखोर ठरवून टाकल्याचे या संभाषणातून दिसत आहे. फुले, शाहू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा आधार घेत वागळेंनी मनातील (बहुतांश) सगळी गरळ ओकली असल्याचे कोणालाही ही ध्वनिफीत ऐकल्यावर वाटेल. मोदी सरकार आल्यापासून समस्त पीत पुरोगाम्यांचा झालेला कोंडमारा आणि या सरकारमुळे (किंवा हिंदुत्ववाद्यांमुळे) आपल्याला बेकार व्हावे लागले, या वैफल्यातून कदाचित वागळेंनी 'पॉईंट ब्लँक'वरून शूट केला असावा. यातील वागळेंची ख्याती अलम जगाला माहीती आहे तर हे अनिरुद्ध जोशी कोण, काळे की गोरे हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

वागळेंच्या या समाजवादी बहादुरीची 'मी मराठी' नावाच्या वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक रविंद्र आंबेकर यांनी पाठराखण केली आहे. याच वाहिनीवरून वागळेंचा कार्यक्रम प्रसारित होत असल्यामुळे दोघांनी एकमेकांचे जीवन समृद्ध केलं, तर त्यात कोणाला काही वावगे वाटायचे नाही. प्रामाणिकपणाची कमाई आणि पाठराखण ही नेहमीच कौतुकास्पद असते. ब्राहण जात आणि ब्राह्मणी मनोवृत्ती या वेगळ्या आहेत, अशी मखलाशी आंबेकरांनी केली आहे. अरे बाबा, पण वागळे त्यात चक्क 'तुम्ही भटांनी, तुम्ही ब्राह्मणांनी' असे शब्द पेरतो, त्याचे काय?

वागळेंच्या प्रामाणिकपणाबद्दल भाऊ तोरसेकरांसारख्या ज्येष्ठ आणि वागळेंच्या समकालीन पत्रकाराने पुरेसे पुरावे दिलेच आहेत. त्यातून त्यांच्या चारित्र्यावर झक्क उजेड पडतो. चार वर्षे ज्या दर्डा शेठचा पगार खाल्ला, त्यांनीच कामावरून कमी केल्यानंतर ट्वीटरवरून शिव्या घालताना वागळ्यांची जीभ सैलावते. दर्डा हे कोळसा गैरव्यवहारातील आरोपी आहेत, हे यांना आधी माहीत नव्हते का? की केवळ 2014 च्या जून महिन्यांनंतरच हा साक्षात्कार झाला. गुटख्याच्या निर्मात्यांकडून स्वतःच्या पुस्तकाला प्रायोजकत्व मिळवून आपण समाजासाठी काहीतरी भव्यदिव्य केले आहे, अशी फुशारकी मिरविणारे हे पत्रकार.

 

A Police Complaint has been Lodged against Nikhil Wagle for inciting communal hatred @Dev_Fadnavis Plz take Action? pic.twitter.com/ZdwaPkWtT4

— Chandrabhushan Joshi (@MatruBhakt) June 7, 2015

अनिरुद्ध जोशींच्या संभाषणातून वागळेंनी ब्राह्मण जातीवर ज्या दुगाण्या झाडल्या आहेत, त्या त्यांनाच लखलाभ. पण त्यांनी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहू (आणि नव्याने कळलेले पेरियार! तेच ते, "तमिळनाडू हा स्वतंत्र देश आहे, सगळे हिंदी भाषक आणि तमिळ भाषक ब्राह्मण हे सैतानाचा अवतार असून त्यांचे शिरकाण करावे,” असे विचार मांडणारे पेरियार!) यांचे नाव घेऊन हे कृत्य केले आहे, ते जास्त धोकादायक आहे. आंबेडकरवादी, दलित संघटना आणि कोणत्याही प्रागतिक विचाराच्या व्यक्तीने याचा निषेध करायलाच पाहिजे. कारण बाबासाहेब आम्हीही वाचले आहेत आणि त्यांच्या विचारावर आमची श्रद्धाही आहे.

'कुठल्याही व्यक्तीचे चारित्र्य किंवा गुण हे तो कोणत्या जातीत किंवा धर्मात जन्मला यांवर आधारित नसून तो काय करतो, त्याचे विचार काय आहेत, यावर ठरतात,' ही बाबासाहेबांची विचारसरणी आहे, असे वाटते. याच्या उलट व्यक्तीला जन्मजात गुण, दोष किंवा योग्यता चिकटविणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एखाद्या वंचित गटातील व्यक्तीचे आई-वडिल निरक्षर आहेत म्हणून ती व्यक्तीही शिकण्यास किंवा इतरांच्या बरोबरीने समाजात भाग घेण्यास नालायक आहे, हे मानणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका ब्राह्मण व्यक्तीने म. गांधींना मारले म्हणून सगळ्या ब्राह्मणांच्या संपत्तीला आगी लावणे, त्यांना जीवे मारणे ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. एका शीखाने इंदिरा गांधींना मारले म्हणून सगळ्या शिखांचे शिरकाण करायला निघणे, ही ब्राह्मणी विचारसरणी आहे. या उलट प्रत्येक व्यक्तीशी व्यक्ती म्हणून वागणे, हा आंबेडकरवादी विचार आहे.

कुठल्या तरी प्रसंगात ब्राह्मण दोषी आढळला, म्हणून जोशी यांना गृहित धरून वागळे जेव्हा सगळ्या ब्राह्मण जातीला आरोपी बनवितात (पिंजऱ्यात उभे करतात नव्हे!) तेव्हा निखिल वागळे नावाचा एक महाभंपक इसम बाबासाहेबांच्या नव्हे तर ब्राह्मणी विचारांच्या मार्गाने जातो. म्हणून दलित संघटनांनी ताबडतोब त्यांच्यापासून दूर व्हावे. जोशी हे नाव गैर-ब्राह्मणांमध्येही असते हे वागळ्यांना माहीत असायला पाहिजे. आणि तेवढेच असेल तर गेल्या पाच वर्षांतील अॅट्रोसिटी कायद्याखाली नोंद झालेल्या किती प्रकरणांचे आरोपी ब्राह्मण जातीतील आहेत, हे 'आमच्यामुळे झाला, आमचा इम्पॅक्ट' असं जेव्हा तेव्हा छाती पिटून सांगणाऱ्या 'मी मराठी' वाहिनीने शोध करून सांगावे.

खरं पाहिलं तर निखिल वागळे आणि अरविंद केजरीवाल या दोन इसमांची कारकीर्द एकाच गोष्टीवर उभी आहे - लोकांना चिथावून मारहाण करायला लावायची आणि बघा, मी कसा अत्याचाराला बळी पडलोय याची जाहिरातबाजी करायची. (समानशीलेषु सख्यम). जेव्हा जेव्हा वृत्तपत्र चालत नाही, नोकरी सुटलेली असते किंवा आपल्याकडे कोणी लक्ष देत नाही, असे दिसते तेव्हा वागळेंना कोणाची तरी छेड काढून मोठे व्हायची तल्लफ येते. बरे, जेव्हा शिवसैनिक मारायला येतात तेव्हा 'मला मारू नका, मी हर्ट पेशंट आहे' असा कांगावाही करता येतो.

जोशींशी बोलताना मी धर्मांतर करीन, अशी धमकी वागळे देताना ऐकू येते. असल्या दांभिकांच्या धर्मांतराची काय पर्वा बाळगायची? बाबासाहेबांनी धर्मांतर केले त्याला नैतिक अधिष्ठान होते, एक तपश्चर्या होती. त्यांच्याकडे बोट दाखवून कोणीही दुकानदार करू पाहत असेल तर त्याला खुशाल जाऊ द्यावे. प्रासादशिखरस्थो ऽपि काको न गरुडायते (राजमहालावर बसल्याने कावळ्याचा गरूड होत नाही).

वारुणी आणि तरुणी यांचा आस्वाद घेत दलित, शोषितांच्या नावाने बाळंतकळा दाखविणाऱ्या झोळीवाल्यांचे एक पीक गेल्या पन्नासेक वर्षांत फोफावले आहे. याचे उदाहरण म्हणजे सध्या गजाआड असलेला तरुण तेजपाल. हाही असाच समाजाचा सगळा व्यभिचार मीच झाडून काढणार, अशा तोऱ्यात सफाई अभियान करायचा. (याच तहलका आणि तेजपालाच्या प्रत्येक ट्वीटला रिट्वीव करण्याचा पूर्णवेळ उद्योग वागळे करायचे, हे येथे नोंदण्याजोगे). यथावकाश त्याच्या लीला उजेडात आल्या, अन् तेही धर्मांध, प्रतिगामी व फॅसिस्ट सरकार सत्तेत नसताना, आणि तहलका काहीसा हलका झाला. परंतु याच पंथातील आणखी काही मंडळी आपल्या मार्गावरून ढळली नव्हती. माकडांनी एकमेकांनी पाठ खाजवावी, तसे एकमेकांची स्तुती करून मोठे करायचे आणि गरिबांच्या दुखण्यावर आपल्या पोतड्या भरायचा, हा यांचा उद्योग. विशेष म्हणजे या पंथातही ब्राह्मण जातीतील लोकांचीच संख्या जास्त असते.

दारु पिताना तोंडी लावायला खारे शेंगदाणे तोंडात टाकावेत तशी ही मंडळी महात्मा फुले, बाबासाहेब, शाहूंची नावे घेणार आणि आपली समाजवादी दुकाने चालविणार, असा हा प्रकार होता.

गेल्या पन्नासेक वर्षांत म्हणायचे कारण म्हणजे त्यापूर्वी जी मंडळी होती ती अस्सल समाजवादी होती. त्यांच्या वागण्या-बोलण्यात सचोटी होती. साने गुरूजी आणि ग. प्र. प्रधान यांच्यासारख्या समाजवाद्यांकडे त्याग होता, प्रामाणिकपणा होता. समाजवादाच्या नावाखाली दाढी वाढवून आपली दुकाने मांडणारी वागळेंसारखी पिढी तेव्हा नव्हती किंवा असली तरी कमी प्रमाणात होती. वेदाध्ययन करणाऱ्या ब्राह्मणांना मान मिळतो हे पाहिल्यानंतर केवळ संस्कृत पोपटपंची करून पोटार्थी भटांची जशी पूर्वी पैदास झाली तशी अलीकडे समता, बंधुता वगैरे बडबड करून तुंबड्या भरणारी एक जमात उगवली आहे. तीच पीत पुरोगाम्यांची जमात. सवंग, नाटक्या आणि पोकळ पुरोगाम्यांची जमात.

जोपर्यंत वृत्तपत्रे आणि दूरचित्रवाणी ही माध्यमे मूठभर कम्युनिष्ट आणि पीत पुरोगाम्यांच्या ताब्यात होती, तेव्हा यांचे चांगले चालले होते. वाचक-प्रेक्षकांकडे त्यांना आव्हान देण्यासाठी काही साधनेच नव्हती. मात्र आंतरजालाच्या प्रसारामुळे प्रत्येक गोष्टीवर प्रश्न विचारण्याची सोय झाली आणि यांच्या पोटात मुरडा आला. तुम्ही जे बोलताय, त्यामागे तर्क काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारू लागली तेव्हा यांच्या नाकाला मिरच्या झोंबू लागल्या. त्यात यांच्या आक्रस्ताळी, एकांगी आणि अतार्किक वागण्यामुळे आपल्या ब्रँडला धोका पोचतो, हे कळाल्यावर वागळे-केतकर-राजदीप संप्रदायाला त्यांच्या त्यांच्या मालकांकडून नारळ मिळाले. (अंबानींनी काढल्यानंतर वागळेंना कोणीही घेतले नाही, हे सूचक होते.) पण हे सर्व नरेंद्र मोदी आणि त्यांच्या हिंदुत्ववादी पक्षामुळेच घडल्याचा समज वागळेंचा झाला. आताच दर्डा शेठच्या मदतीने नवीन चॅनल काढून परत हातवारे करायला मिळणार, असा मनसुबा चालला होता. पण तोही फिसकटला आणि प्रसिद्धीला चटावलेल्या या पीत पुरोगाम्याने जोशीच्या निमित्ताने आपली 'जात' दाखवली.

(निखिल वागळे आणि अनिरुद्ध जोशी यांच्या संभाषणाची हीच ती ध्वनिफीत - https://t.co/Mx7BOxklCi)

Tuesday, June 2, 2015

घुमानच्या निमित्ताने-5 भिंडराँवालाचा गुरुद्वारा!

Gurudwara यातीलच एक गुरुद्वारा जर्नैलिसिंग भिंडराँवाला (भिंद्रनवाले) याचाही आहे. पंजाबमध्ये खालसा चळवळ जोरात होती, त्यावेळी या भिंडराँवाला आणि त्याच्या हस्तकांच्या कारवायांमुळे सुवर्णंमंदिर बदनाम झाले होते. ६ जून १९८४ रोजी भिंडराँवालाचा बीमोड करण्यासाठी इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार लष्कराने‘ऑपरेशन ब्ल्यू स्टार’ राबविले. त्यावेळी मंदिराचे बरेच नुकसान झाले. यात भिंडराँवाला मारला गेला. परंतु त्याच्या अनुयायांनी त्याच्या स्मृत्यर्थ एक गुरुद्वारा बनविला आहे.

हा गुरुद्वारा केवळ तीन वर्षांपूर्वी (2012) बांधला आहे. आधी ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या स्मृत्यर्थ एक स्मृतिस्थळ बनविण्याची योजना होती. पण केंद्र सरकारने घेतलेला आक्षेप,काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेली टीका आणि लेफ्ट. जन. (निवृत्त) कुलदीपसिंग ब्रार व केपीएस सिंग गिल यांच्यासारख्यांनी केलेला विरोध, यामुळे स्मृतिस्थळाऐवजी गुरुद्वाऱ्यावरच काम भागले.

हरमंदिर साहिबला जाण्यासाठी जी रांग लागते त्या रांगेच्या बाजूलाच हा गुरुद्वारा आहे. भिंडराँवालाला येथेच गोळ्या घालून मारण्यात आले, असे म्हणतात. 'काँग्रेस सरकारने राबविलेल्या मोहिमेत शहीद झालेले जर्नैलिसिंग भिंडराँवाला' असा या गुरुद्वाऱ्याच्या पायथ्याशी शिलालेख आहे.

इतकेच कशाला, सुवर्णंमंदिराच्या प्रवेशद्वाराशी शिखांचे संग्रहालय असून त्यात शीख हुतात्मे, लढाया आणि इतिहास यांची माहिती आहे. त्यातही भिंडराँवालाचे गुणगान गायले आहे. मात्र त्याची फिकीर करण्याची गरज वाटली नाही. कारण मी पाहिले, की गुरुद्वाऱ्यात जाणारे भाविक भिंडराँवाला किंवा खलिस्तानबाबत फारशी आस्था बाळगून जात नाहीत. हरमंदिर साहिबच्या प्राकारातील सर्व उपासना स्थळ त्यांना पवित्र वाटतात. त्यामुळे तिथे डोके टेकवून ते जातात. याच प्रांगणात एक बोराचे झाड असून त्यात दैवी शक्ती आहे, असे मानतात. त्या झाडाची लोक जशी पूजा करतात तशीच या गुरुद्वाऱ्यात माथा टेकतात.

दमदमी टाकसाळ किंवा भिंडराँवाला किंवा खलिस्तान अशा बाबींशी त्यांना काहीही देणेघेणे नसते. एकीकडे भिंडराँवालाला हुतात्मा बनवून हळूच त्याच्या आंदोलनाची हवा काढण्याची उत्तम राजकीय चाल भारतीय सरकारने खेळली आहे. कारण या गोष्टी उभारण्याची परवानगी दिली नसती, तर विनाकारण खलिस्तान्यांच्या हाती कोलीत मिळाले असते आणि ती नसती डोकेदुखी ठरली असती. तीन वर्षांपूर्वी सुवर्ण मंदिरात ऑपरेशन ब्ल्यू स्टारच्या दिवशी झालेली तलवारबाजी डोळ्यांपुढे आणली, तर कल्पना येईल की काय गहजब झाला असता.

ते असो. पण हरमंदिर साहिबमध्ये फिरताना दोनदा शिरा खाल्ला. गुरुद्वाऱ्याचा प्रसाद म्हणून नांदेडला असताना हा शिरा कितीदा तरी खाल्लेला. आता येथे परत तीच चव, तोच तुपकट ओशटपणा आणि तोच सुगंध. शुद्ध आटीव तुपाचा घमघमाट ल्यालेला हा शिरा हातातून तोंडात टाकण्याची इच्छाच होत नाही. या शिऱ्याच्या बदल्यात शीख धर्म स्वीकारण्याची अट असती तर तीही मान्य केली असती, इतकी त्याची लज्जत भारी. घास न घेता या शिऱ्याचा मुटका ओंजळीत घेऊन त्याचा सुवासच घेत राहावा, अशी इच्छा होत राहते. मात्र त्याही मोहावर विजय मिळवून त्याला गिळंकृत केले.

याच्या जोडीला नांदेडहून आलेली एक यात्रा आणि घुमानला जाण्यापूर्वी आलेले अनेक लोक, असे बहुतांश मराठी लोक त्याचवेळेस हरमंदिर साहिबमध्ये आलेले असल्याने अवतीभवती मराठी स्वर कानावर पडत होते. येथे परत काळ आणि वेळेची गल्लत होऊ लागली. मी कुठे आहे? अमृतसर का नांदेड? आणि पुण्याचे काय झाले? या मधल्या १८ वर्षांचे काय झाले? असे प्रश्न पडू लागले.

Thursday, May 28, 2015

घुमानच्या निमित्ताने– 4 हरमंदिर साहिबच्या पवित्र प्रांगणात

Golden Temple Amritsar

अमृतसरला पोचल्यानंतर पहिल्यांदा बसस्थानकावरच राहण्याची खोली घेतली. येथील बस स्थानकावर सामान ठेवण्याची आणि खोलीची चांगली सोय आहे. भाड्यानुसार खोलीचा दर्जा बदलतो. नाही म्हणायला हरमंदिर साहिब (सुवर्ण मंदिर) आणि अन्य गुरुद्वाऱ्यांच्या यात्री निवासांमध्ये राहण्याची सोय होते, परंतु मी ऐकले, की एकट्या व्यक्तीला सहसा तिथे जागा मिळत नाही. म्हणून असा खासगी निवासाचा मार्ग पत्करावा लागला. चेन्नई, म्हैसूर अशा ठिकाणी मी ही सोय पाहिली आहे. बस स्थानकावरच राहण्याची सोय उपलब्ध असते. आपल्याकडे मला मुंबईचे माहीत नाही परंतु अन्य शहरात तरी अशी सोय मला दिसली नाही. पुण्यात तर बस स्थानकांचाच पत्ता नाही तिथे राहण्याचा काय ठावठिकाणा?

अमृतसरला आल्यानंतर पाहण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे हरमंदिर साहिब. सुवर्ण मंदिर या नावाने ते अधिक प्रसिद्ध आहे. ते शिखांचे उपासनामंदिर आहे, प्रसिद्घ पर्यटनस्थळ आहे आणि सांस्कृतिक केंद्रही आहे. शहरातील एका भव्य तलावाच्या मध्यभागी वसले आहे. वास्तविक या तलावामुळेच या शहराला अमृतसर हे नाव मिळाले आहे. ज्या तलावातील पाणी अमृत आहे तो अमृतसर. शिखांचे चवथे गुरु रामदास यांनी या शहराची स्थापना केली. तेव्हा या शहराला रामदासपूर असे नाव होते. या गुरुद्वाऱ्याचा उल्लेख स्थानिक लोक हरमंदिर साहेब, दरबार साहेब, हरिमंदिर अशा नावांनीही करतात. 

शिखांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथसाहिब पहिल्यांदा या मंदिरात ठेवला गेला. एखाद्या गुरुद्वाऱ्यात गुरु ग्रंथसाहिब ठेवणे याला प्रकाश होना असे म्हणतात. तर गुरु ग्रंथसाहिबचा पहिला प्रकाश पहिल्यांदा येथे प्रकट झाला. त्यामुळे या मंदिराला शीख संप्रदायात सर्वोच्च स्थान आहे. गुरु रामदास यांनी त्याचा पाया घातला. विशेष म्हणजे गुरु रामदास यांनी एका मुस्लिमाच्या हातून पायाचा पहिला दगड रचला. पुढे पाचवे गुरु अर्जुनदेव यांनी १५८८–१६०७ दरम्यान त्याचे बांधकाम पूर्ण केले. नंतर वेळोवेळी सभोवतीच्या प्राकारातील वास्तूत बदल होत गेला. मात्र मूळ मंदिराची रचना होती तशीच आहे. 

Golden Temple Amritsar
हरमंदिर साहिबची वास्तू चौरस असून सांडवा किंवा साकवावरुन मंदिरात प्रवेश करावा लागतो. मुंबईच्या हाजी अलीची आठवण यावेळी येते. सध्या तेथे भलीमोठी रांग लागते आणि भक्तांना किमान दोन तास वाट पाहावी लागते. मला स्वतःला दोन तास लागले आणि घुमान येथे भेटलेल्या काही जणांनी अडीच-तीन तास लागल्याचेही सांगितले. नुसता वेळच लागत नाही तर या रांगेमध्ये चांगलीच रेटारेटी आणि ढकलाढकली चालू असते. एखाद्या हिंदू मंदिरातील स्थितीची आठवण करून देणारा हा गोंधळ असतो. त्यामुळे हरमंदिर साहिबपर्यंत पोचणे हा मोठाच अवघड प्रसंग ठरतो.

मंदिराची मूळ वास्तू दुमजली आणि त्यावर घुमट अशी आहे. येथे भव्यता कमी आणि पवित्रता जास्त आहे. मुख्य म्हणजे एवढी मोठी वास्तू सोन्याची असल्यामुळे ती झळाळीच डोळ्यांने पारणे फेडते. त्यामुळे भव्यता कमी असली तरी चालून जाते. मंदिराला चारही बाजूंनी प्रवेशद्वारे आहेत. 

अहमदशहा अब्दाली याने या मंदिरावर विध्वंसक हल्ला केला होता. पुढे शिखांच्या बाराव्या मिस्लने मंदिराची झालेली पडझड दूर करुन पुनर्बांधणी केली. महाराजा रणजितसिंग यांनी मंदिराच्या मूळ रचनेला धक्का न लावता त्याची पुनर्बांधणी संगमरवरी दगडात केली व कळस तांब्याच्या पत्र्याने मढवून त्याला सोन्याचा मुलामा चढविला. (नांदेड येथील गुरुद्वाराही महाराजा रणजितसिंह यांनीच बांधून घेतला आहे.) तेव्हापासून ते सुवर्णंमंदिर म्हणून ख्यातनाम आहे.  शिखांच्या संदर्भातील सर्व निर्णय घेणारे ‘अकाल तख्त’ हरिगोविंद यांनी मंदिरासमोर बांधले आहे. मंदिराच्या परिसरात अनेक लहान गुरुद्वारे आहेत. त्यांत शिखांच्या ऐतिहासिक शौर्यगाथा दर्शविणाऱ्या धातूंच्या तबकड्या लावल्या आहेत. त्यावर वीरमरण पत्करलेल्या सैनिकांची नावे कोरलेली आहेत.

Thursday, May 21, 2015

घुमानच्या निमित्ताने– 3 सुवर्ण मंदिराच्या शहरात

tumblr_nm9zlj5iky1u5hwlmo1_1280[2] नवी दिल्लीहून आधी अमृतसर येणे. त्यासाठी दिल्लीच्या महाराणा प्रताप आंतरराज्य बस स्थानकावर यायचे. तिथे गाडी पकडायची, असे सगळे सोपस्कार पार पाडले. परंतु तिथे गेल्यावर लक्षात आले, की दिल्लीहून थेट अमृतसरला बस नाही. म्हणजे गाड्यांवर पाट्या अमृतसरच्याच लागतात परंतु त्या तिथपर्यंत जात नाहीत. मार्गात जालंधर (पंजाबीत जलंधर) येथे थांबतात. त्यातही काही गाड्यांसाठी आधी तिकिट घ्यावे लागते आणि त्यांचे आसन क्रमांक ठरलेले असतात. त्यामुळे जालंधरच्या एका गाडीत चांगला बसलेलो असताना उतरावे लागले.

अशा दोन तीन गाड्या सोडल्यानंतर रात्रीचे साडे दहा-अकरा वाजू लागतात आणि आपला धीर खचायला लागतो. अमृतसरला कधी पोचणार, तिथले सुवर्ण मंदिर कधी पाहणार, जालियांवाला बाग कधी पाहणार, अशा नाना प्रकारच्या चिंता मनात येऊ लागतात. तेवढ्यात देवाने धाडल्यासारखी दिल्ली-अमृतसर अशी पाटी लागलेली एक गाडी येते. हिय्या करून आपण त्याला विचारतो, "गाडी अमृतसर जाएगी ना?" त्यावर तद्दन बाऊन्सरसारखा दिसणारा मात्र कंडक्टरचे काम करणारा इसम आपल्याला सांगतो, की जाईल पण साडे अकराला निघेल. तिकिट मीच देणार आहे, असेही सांगतो. आपल्याला वाटते, झाले, अब अमृतसर दूर नहीं. परंतु तिकिट फाडून हातात देताना कंडक्टर आपल्याला सांगतो, की तिकिटांचे यंत्र जालंधरचे असल्यामुळे जालंधरपर्यंतचे तिकिट घ्या आणि पुढचे नंतर देतो. पाऊण प्रवास झाल्यानंतर तोच कंडक्टर आपल्याला सांगतो, की गाडी जालंधरपर्यंतच जाणार आहे, तिथे अर्धा तास थांबेल. तुम्हाला उशीर होईल म्हणून तुम्ही दुसऱ्या गाडीने जा. शेवटी अडला हरी...ही म्हण मनातल्या मनात घोळत जालंधरच्या अलीकडे चार-पाच किलोमीटरवर आपण दुसऱ्या गाडीत बसतो. दुःखात सुख एवढेच, की कंडक्टर आपल्याला त्या गाडीत लवकर जाऊन बसायला सांगतो आणि दुसऱ्या गाडीच्या चालक-वाहकांना आपल्यासारख्या प्रवाशांसाठी थांबण्यास सांगतो.

असा हा प्रवास करून एकदाचा अमृतसरच्या दिशेने गाडीत जाणाऱ्या गाडीत बसलो. पहाट सरून ऐन सकाळची वेळ. ढगाळ वातावरणामुळे हवेत गारवा आणि संपूर्ण गाडीत आपल्या अवतीभवती पगडीधारी मंडळी. अशा स्थितीत रस्त्यातील पाट्या नि गुरुद्वारे न्याहाळत मी प्रवास चालू ठेवला. अमृतसर...नांदेडमध्ये पहिल्यांदा ब्रॉडगेज ही गाडी धावू लागली (आणि हा मोठा ऐतिहासिक क्षण होता बरं का) तेव्हापासून ज्या शहरास जाणारी वाट नित्य दिसायची तेच हे शहर. नांदेड स्थानकावरून मुंबई पाठोपाठ ज्या शहरासाठी लांब पल्ल्याची गाडी सुरू झाली ते हे शहर. सचखंड एक्स्प्रेसने येथे यायचे, हा मनसुबा ही गाडी सुरू होऊन वीस वर्षे होत आली तरी मनसुबाच राहिला होता. तो काही अंशी पूर्ण होण्याची वेळ आज आली होती.

अमृतसर येण्यापूर्वी एकामागोमाग शुभ्र झळाळत्या घुमटांचे गुरूद्वारे मागे क्षितीजावर दिसू लागले. नुकत्याच पडलेल्या पावसामुळे हवते गारवा होता आणि ओलाव्यामुळे या गुरुद्वाऱ्यांचे संगमरवरी पृष्ठभाग आणखीच उजळून निघत होते. अन् येथे काळ व वेळेचा गुंता निर्माण होऊ लागला. 'अॅन एरिया ऑफ डार्कनेस' या पुस्तकात सर व्हिवियन नायपॉल यांनी आपल्या जन्मगावाला भेट दिल्यानंतर अनेकदा काळ व वेळेची सरमिसळ झाल्याचा उल्लेख केला आहे. भारतीय खेड्यांमध्ये आपल्या पूर्वजांच्या गावांमध्ये नायपॉल यांना जन्मभूमीच्या, बालपणीच्या खाणाखुणा दिसत जातात आणि आपण कुठे आहोत, नक्की काळ कोणता आहे, असे प्रश्न त्यांच्या मनात उमटत जातात.

इथे उलट घडत होते. जन्मगाव सुटल्यानंतर १९ वर्षांनी एका परक्या प्रदेशात एका व्यक्तीला त्याच्या जन्मगावाशी साधर्म्य सांगणारी परिचित दृश्ये दिसत होती आणि आपण नक्की कुठे आलो आहे, काळ पुढे गेला आहे का मागे गेला आहे, असे विचार मनात गर्दी करू लागले. खुद्द अमृतसरला आल्यानंतर तर अशा ओळखचिन्हांची गिरवणी सुरू झाली. नांदेडची आठवण करून देणारे तेच अरूंद रस्ते, पाऊस पडल्यानंतर रस्त्यावर तयार होणारे तेच डबके, तशाच पायरिक्षा, तोच गर्दी-गोंधळ आणि रस्त्यांच्या कडेने उघड्या हॉटेलांमधून येणारा तोच पराठा, भाजी व तंदुरी चिकनचा वास! खिशातील तिकिटे आणि खर्च झालेला पैसा यांची जाणीव होती म्हणून, नाही तर आपण परक्या प्रदेशात आलो आहोत, हे कोणी सांगूनही मी मान्य केले नसते.

Tuesday, May 5, 2015

घुमानच्या निमित्ताने – 2 ‘झेलम’मधील चर्चासत्र


Devidas0633
झेलमचा प्रवास मात्र मस्तच झाला. भोपाळ, ग्वाल्हेर, झाशी अशा मोक्याच्या स्थानकांवर गाडी दिवसा पोचली. त्यामुळे अवतीभवतीचा प्रदेश तर चांगला न्याहाळता आलाच, परंतु दररोज ये-जा करणाऱ्या ‘जिव्हाळ्या’च्या प्रवाशांच्या अनौपचारिक गप्पांमुळे बरीच मनोरंजक माहितीही मिळाली. भारतीय रेल्वेमध्ये बसायची जागा मिळाली, तर त्यासारखे प्रबोधन आणि मनोरंजन करणारे दुसरे साधन नाही, याची प्रचिती परत एकदा आली. सतत येणाऱ्या कंत्राटी फेरीवाल्यांकडून मधूनच चहा घ्यायचा आणि मस्त गप्पा ऐकायच्या. ही ‘चाय पे चर्चा’ आपल्याला एकदम शहाणी करून सोडते.

दरम्यान मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थान मागे टाकून गाडी परत उत्तर प्रदेशात आली होती. मथुरा पार पडले, की दिल्लीच्या हवेच्या वास यायला लागतो. उत्तर प्रदेशापासूनच गिलावा न केलेल्या उघड्या बांधकामांचे घर दिसायला लागतात. एरवीही संपूर्ण प्रदेशावर गरिबीचीच सावली दिसत राहते. अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले दिसत होते. शेतात पिके होती परंतु पिकात जान दिसत नव्हती.

मध्य प्रदेशातील दातिया येथून ग्वाल्हेरपर्यंत आमच्या डब्यात बसलेल्या अधिकाऱ्यांच्या एका गटाची चर्चा चांगलीच रंगली. राज्यातील भ्रष्टाचार, तरुणांमधील बेरोजगारी, ग्ग्रामीण भागातील लोकांचे स्थलांतर अशा अनेक विषयांवर ते बोलत होते. मी सकाळी एक वर्तमानपत्र घेतले होते. पण संपूर्ण वृत्तपत्र वाचून जेवढी माहिती मिळाली, त्याच्या कित्येकपट जास्त माहिती त्या दीड दोन तासांच्या चर्चासत्रात मिळत गेली. शिवराज चौहान यांच्या स्वच्छ कारभाराच्या चकचकीत प्रतिमेवर त्यातून ओरखडे तर पडत होतेच, नव्या पिढीच्या भविष्याची चिंताही सतावत होती.

बच्चों को यहां नौकरी ही नहीं है, साब. हमारे गांव से गुजरात के लिए एक बस हर दिन भरकर निकलती है. अहमादाबाद और राजकोट में सब हमारे लड़के काम कर रहै है,” “हमारे गांव का एक लड़का पूना में पानीपुरी बेचता था. मैंने उसको देखा तो पूछा, ये क्या कर रहे हो. उसने बताया, साब हमने एक फ्लैट ले लिया है. अभी सोचो साब पंदरह साल पहले की बात है, आज उसकी क्या कमाई होगी. मुंबई, पूना में काम है कमाई है, हमारे यहां क्या रखा है,” ही त्यातील काही लक्षात राहिलेली वाक्ये.
त्याच्या पुढची हद्द आणखी पुढे होती.

हमारे गांव के तो कितने लोग महाराष्ट्र-गुजरात में सिक्युरिटी गार्ड का काम करते है,” एकाने सांगितले.

त्यावर दुसऱ्याने विचारले, “हां, और एक दो काण्ड भी करके आए थे ना वो.”

पहिल्याने सांगितले, “हां, किए थे ना.”

आपल्या राज्यातील सर्व भल्या-बुऱ्या गोष्टींची धुणी रेल्वे कपार्टमेंटमधील दोन बाकांवर समोरासमोर बसून ही बाबू मंडळी धूत होती. अन् त्या चर्चेत मी तर पडलोच नव्हतो. शेवटपर्यंत. त्यांच्या आपसातील चर्चेतूनच ही मौलिक माहिती मिळत होती. मी ही चर्चा कान देऊन ऐकत आहे, याची जाणीव असूनही त्यांच्यापैकी कोणी ती थांबविण्याचा किंवा तिला वळण देण्याचा प्रयत्न करत नव्हते. ही बाब मला मोठी लक्षणीय वाटली.

गाडीत पी. जी. वुडहाऊसचे 'स्मिथ दि जर्नलिस्ट' हे पुस्तक वाचून पूर्ण केले. आधी हे पुस्तक काहीसे वाचून झाले होते परंतु ते संपविण्यात यश आले ते या प्रवासात. महत्त्वाचे म्हणजे ते वाचले माझ्या मोबाईलवर.

Devidas0628
एरवी १४ तास, १७ तास अशा विलंबाचे छाती द़डपून टाकणारे आकडे नोंदवून झेलम एक्स्प्रेसने सर्वार्थाने आसेतू हिमाचल आपली दहशत निर्माण केली आहे. या गाडीची ही ख्याती ऐकून असल्यामुळे असावे कदाचित, गाडीने केवळ ४५ मिनिटांच्या उशीराने नवी दिल्ली स्थानकावर सोडले, याचे मोठेच कौतुक वाटले.

Friday, April 24, 2015

घुमानच्या निमित्ताने – 1 शुभास्ते पंथानः

When you return to a place after a long time, you realize how much you yourself have changed over the time – Nelson Mandela

पंजाबला कधीही गेलेलो नसलो तरी पंजाबी भाषा, पंजाबी संस्कृती आणि शीख पंथ हे माझ्यासाठी अपरिचित कधीही नव्हते. किंबहुना जन्मल्यापासून पंजाबी वातावरण मी अवतीभोवती पाहतच होतो. नांदेडचा असल्यामुळे गुरुद्वारा काय, अरदास किर्तन काय किंवा होला मोहल्ला काय, यांचे अप्रूप मला नव्हते. ते माझ्या दैनंदिन जीवनाचा भाग तर होतेच, पण शीख वर्गमित्र, कुटुंबाचे शीख स्नेही यांच्यामुळे पंजाबीपणा हा माझ्या जाणिवेचा भागच होता. नांदेड सोडण्यापूर्वी एक दोन वर्षे, १९९६-९७ च्या दरम्यान, तर जवळ जवळ प्रत्येक दिवशी गुरुद्वारा हुजूर साहिब आणि गुरुद्वारा लंगर साहिब ही आमची हक्काची ठिकाणे होती. अठरा वर्षे पुण्यात राहिल्यामुळे ही जाणीव पुसट झाली होती. नंतर दक्षिण भारतीय संस्कृतीचा ध्यास लागल्यानंतर तर ही जाणीव अगदीच झिरझिरीत झाली. लुई टॉलस्टॉय यांच्या भाषेत सांगायचे, तर "एखाद्या खानावळीवरील जुन्या पाटीसारखी ती झाली होती. त्यावर काहीतरी लिहिले होते, हे समजत होत परंतु काय लिहिले आहे हे कळत नव्हते.”

त्यामुळे घुमान येथे होणाऱ्या ८८ व्या साहित्य संमेलनाला जायचे हे जेव्हा नक्की झाले, त्यावेळी पहिल्यांदा माझी भावना नेल्सन मंडेला यांच्या वरील वाक्यासारखी होती. हा एक प्रकारचा शोधच होता. पुण्याहून झेलम एक्प्रेसने नवी दिल्लीला निघालो त्यावेळी तरी ही भावना अंधुक स्वरूपात होती. कारण नाही म्हटले तरी पंजाबचे भूदृश्य अनोळखी असल्याची भावना मनात होती. त्याहून महत्त्वाचे म्हणजे पूर्ण १९ वर्षांनी मी उत्तर भारतात जात होतो. मनमाड-भुसावळ आणि तेथून मध्यप्रदेश या मार्गावर एकेकाळी प्रवास केला होता. त्यावेळी निव्वळ भणंग म्हणून वाट मिळेल तिकडे मी भटकत होतो. आज २०१५ साली त्याच मार्गावरून जाताना माझ्या स्वतःमध्ये किती बदल झाला, याचीच चाचणी या प्रवासात होणार होती. किमान तशी व्हावी, ही अपेक्षा होती.

नाही म्हणायला गेल्या वर्षी दिल्लीची एक फेरी झाली होती. परंतु त्यात भोज्याला शिवून येण्यासारखा प्रकार होता. त्यात अनुभव घेणे, हा प्रकार फारसा झालाच नाही. या फेरीत मात्र अनुभवांची आराधना तेवढीच असणार होती. त्यामुळे या प्रवासाची असोशी अधिक होती.

Devidas0622 पुणे रे ल्वे स्थानकावर झेलम एक्प्रेसमध्ये बसलो ते या पार्श्वभूमीवर. गाडीत बसल्यावर आश्चर्याचा पहिला धक्का बसला. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी जाहीर केलेल्या अंदाजपत्रकातील घोषणांची अंमलबजावणी वेळेआधीच झालेली दिसली. वास्तविक अंदाजपत्रकातील घोषणा एक एप्रिलपासून अमलात येतात. परंतु ३१ मार्चलाच झेलम एक्स्प्रेसच्या शौचकूपात बायो टॉयोलेट बसविलेले होते. प्रत्येक आसनाजवळ मोबाइल चार्जिंगची सोय केलेली होती. इतकेच नाही तर वरच्या आसनावर जाण्यासाठी अधिक चांगल्या पायऱ्यांची सोय केलेली दिसली.

जातानाच पूर्णपणे स्वतंत्र गाडीने आणि स्वतंत्र मार्गाने जायचे, याचा निश्चय मी आधीच केला होता. त्यामुळे झाले काय, की वृत्तपत्रांतून ठळक घोषणा केलेल्या पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी ऐन परीक्षेच्या काळात रेल्वेच्या डब्यात केलेल्या कवितांचे सादरीकरण, फ्लॉवर आणि टमाटे या झक्कास मिश्रण असलेल्या भाज्यांची मेजवानी अशा प्रक्षोभक मनोरंजनाला मी मुकलो. परंतु हाच निर्णय योग्य होता, हे घुमानला पोचल्यानंतर सिद्ध झाले. नवी दिल्ली, अमृतसर आणि घुमान अशी त्रिस्थळी यात्रा केल्यानंतर कळाले, की संयोजकांच्या सौजन्याने धावणारी ती गाडी वास्तवात धावलीच नाही. कण्हत-कुंथत साठ तास घेऊन ती गाडी अमृतसरला पोचेपर्यंत संमेलनाच्या उद्घाटनाची वेळ येऊन पोचली होती.