Saturday, December 8, 2007

घेता किती घेऊ दो कराने?

मी श्रीमंत व्हावे, ही नियतीचीच इच्छा दिसत आहे. मी सुखात राहावे, चंगळ करावी, खूप पैसा-अडका मला विनासायास मिळावा, देश-परदेशांत भरपूर भटकंती करायला मिळावी, किरकोळ दुकानदारांपासून मोठमोठ्या शॉपिंग मॉलमध्ये मी बेधडक प्रवेश करून खरेदी करावी...आणि त्याची किंचितही झळ माझ्या खिशाला लागू नये, अशी सोयच माझ्या नशीबात झालेली दिसत आहे. आता फक्त मी होय म्हणायची खोटी आहे, की बस्स! नेमकं इथंच घोडं पेंड खातंय...

स्थावर घर नसतानाही जगाच्या संपर्कात राहण्यासाठी सोय करून देणारा इ-मेल आला तेव्हा मला काय आनंद झाला होता. मात्र त्याच इ-मेलमुळे मला जगाच्या कानाकोपऱयातून संपत्तीचा वर्षाव होईल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. मात्र मी मुळातच नशीबाचा सिंकदर, त्यामुळे नायजेरिया, इथियोपिया, इरिटेरिया अशा नाना नावाच्या आणि आकारांच्या देशांतून मला पैसा मिळवून देण्याच्या ऑफर्स येत आहेत. या ऑफर्स एवढ्या अनपेक्षित, अनोख्या आणि अनोळखी देशांतीली आहेत, की मला अनेकदा त्या देशांची जागा बघण्यासाठी जगाच्या नकाशाकडे बारकाईने लक्ष द्यावे लागले आहे. या ऑफर्समुळे माझ्या एक लक्षात आलंय हं, की नायजेरियातल्या प्रत्येक दोन माणसांमागे एकाचा शंकास्पद परिस्थितीत मृत्यू झालेला असतो. त्यातील प्रत्येक व्यक्तीच्या नावावर अफाट संपत्ती ठेवलेली असते. (अन ते राष्ट्रसंघाच्या अहवालांतील दुष्काळाची छायाचित्रे, मला तर आता त्यांचीच शंका येत आहे.) मात्र माझ्या सज्जन स्वभावाची, सच्चरित्राची आणि वरती असलेल्या कनेक्शनची ख्याती अख्ख्या जगात असल्याने त्या व्यक्तीचे वारसदार मला मेलद्वारे कळवतात. त्यांची संपत्ती मिळवून देण्याच्या बदल्यात ते मलाही प्रचंड मोठी रक्कम द्यायला तयार असताता म्हाराजा...!

अशा किती ऑफर आल्या आणि म्या करंट्याने त्या तेवढ्या ऑफरचा अव्हेर केला की हो! नायजेरिच्या ७० टक्के, इरिटेरियाच्या ४० टक्के आणि बुर्किना फासोच्या २० टक्के लोकांनी मला अशा प्रकारे मदत देऊ केली आहे. पण माझा स्वभाव पडला भिडस्त आणि दळभद्री. त्यामुळे मी त्यांचा लाभच घेतलेला नाही. तसा घेतला असता तर आतापर्यंत मी किती श्रीमंत झालो असतो, कल्पना करता का. आतापर्यंतच्या ऑफरपैकी अर्ध्या ऑफऱ जरी मी स्वीकारल्या असत्या तरी अमेरिकेचे तीन अध्यक्ष, दोन बिल गेटस आणि एक किंवा दीड अझीम प्रेमजी मी विकत घेऊ शकलो असतो. (लालूप्रसाद यादव किंवा अन्य राजकारणी घेणे मला शक्य नाही, तेवढ्या ऑफर अजूनही मला आल्या नाहीत. याची खरोखर खंत वाटते.)

हे कमी होतं म्हणून की काय, अलिकडे मी न काढलेल्या लॉटरी तिकिटांनाही प्रंचड मोठ्या रकमेची बक्षीसे लागत आहेत. इग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशांतील लॉटरी कंपन्या केवळ माझ्या सुखासाठी त्यांची बक्षिसे मला देऊ करत आहेत. माझा इ-मेल ऍड्रेस साक्षात कुबेरानेच तयार केला असल्यामुळे त्या ऍड्रेसवर जगाच्या कानाकोपऱ्यातून बक्षिसांचा वर्षाव होत आहे. अगदी गेल्या आठवड्यात मला याहू-एमएसएन या कंपन्यांच्या नावे असलेल्या लॉटरीचे बक्षिस देऊ करण्यात आले. त्यातील रक्कम पाहूनच मला विचार आला, की अंबानी-टाटा वगैरे मंडळी कशासाठी एवढ्या कंपन्या काढतात आणि मेहनत घेतात. त्यांनी इ-मेल अकांउंट काढला तर घरबसल्या त्यांना सध्यापेक्षा कितीतरी अधिक पैसा मिळेल. मी मात्र खरोखर या ऑफरचा लाभ घेऊ शकलो नाही. माझी मध्यमवर्गीय मानसिकता माझ्या मला तसं करूच देत नाही, काय करू?

या ऑफरचा लाभ घेतला नाही म्हणून काय झाले. इकडे भारतातल्या कंपन्याही माझ्या सुखासाठी काही कमी धडपड करत नाहीत. काहींनी क्रेडिट कार्ड काढले आहेत, काहींनी तरुणांसाठीच्या विमा योजना काढल्या आहेत, काहींनी गुंतवणुकीच्या आकर्षक योजना काढल्या आहेत. नुसत्या काढल्या आहेत, असे नव्हे. या योजनांचा मी पुरेपूर वापर करावा, याचाही ते प्रेमळ आग्रह करतात. बरं, त्यांचं अगत्य एवढं की मी योजनांचा लाभ करून न घेता माझ्या गरिबीच्या दिवसांत राहिलो तरी त्या योजनांची प्रत्येक बारीकसारीक गोष्ट मला कळविल्याशिवाय त्यांना सुखाचा घास जात नाही. एका क्रेडिट कार्डच्या कंपनीने त्यांच्या कार्डचा आकार १० सेंमीवरून आठ सेमी केला, हे त्यांनी मला नऊ वेळा मेल करून कळविले. माणूस अर्धमेला होणे म्हणजे काय हे मला तेव्हा कळाले. एका विमा कंपनीच्या दरात बदल नाही, मुदतीत बदल नाही का प्रिमियममध्ये बदल नाही. तरीही ती कंपनी मला सारखी ती माझ्या पाठीशी उभी असल्याची जाणीव करून देते. कारण काय, तर त्या कंपनीच्या जाहिरातीतील मॉडेल अलिकडे बदलली आहे. पूर्वीची मध्यमवयीन ललनेच्या जागी आता एक षोडशवर्षीय नवोढा आली आहे. आता सांगा, याहून अधिक काळजी कोण घेणार?

माझ्या सौख्यासाठी नेट लावून प्रयत्न केवळ मेलद्वारे होतायत असे नव्हे. प्रत्यक्ष जगातही त्यासाठी अनेकजण दिवसरात्र एक करत आहेत. मोबाईल नामक यंत्राद्वारे त्याची अनेक प्रात्यक्षिके अधून-मधून (म्हणजेच सातत्याने) चालू असतात. एका कंपनीने गुंतवणुकीची खूप छान योजना आणली होती. त्यामुळे मला महिन्याच्या महिन्याला मोठी रक्कम मिळणार होती. ही सर्व माहिती सांगणारी मुलगी अशा सुरांत सांगत होती, की अगदी त्या कंपनीचाच मालक असतो तरी त्या आवाजाल भूलून मी गुंतवणूक केली असता. पण हाय रे दैवा! मी त्या कंपनीचाच काय, मी काम करत असलेल्या कंपनीचाही मालक नाही. त्यामुळे तिची सगळी योजना सांगून झाल्यावर मी तिला एका शब्दांतच सांगितलं, “तुम्ही सांगताय ते खरं आहे. मला तुमची योजना आवडली. पण त्यात गुंतवणूक करण्यासाठी माझा सध्याचा पगार वाढवायला पाहिजे. तुम्ही जरा आमच्या कंपनीत फोन करून सांगता का, त्याबद्दल?”

यानंतर त्या मुलीने संवाद आटोपता घेतला व पुन्हा कॉल केलाही नाही. पण मला विश्वास आहे, की मला परवडेल आणि फायदा होईल, अशी एखादी योजना तयार करायला तिने तिच्या कंपनीला सांगितलेच असेल. पण असे प्रयत्न करणारी ती एकटीच थोडी आहे. विविध क्रेडिट कार्ड, बँका त्यांच्या मोठमोठ्या आणि प्रतिष्ठित ग्राहकांमध्ये माझे नाव जोडण्यासाठी उतावीळ झाल्या आहेत. त्यामुळे माझ्या मोबाईलवर मित्र आणि नातेवाईकांच्या कॉलपेक्षा या कंपन्यांच्या कॉलचीच संख्या जास्त झाली आहे.

या सगळ्यांना नाराज करायला माझ्या जीवावर येतं. पण करणार काय. आपल्याला पडली कष्टाची भाकर खाण्याची सवय. त्यामुळे या सुख-समृद्धीच्या योजना डोळे दिपवून टाकत असल्यातरी नजरेत भजत नाहीत. त्यामुळे मी अजूनही करंट्यासारखा या योजना केवळ वाचून सोडून देतो. या सर्वांचा त्यामुळे हिरमोड होत असेल, याची मला जाणीव आहे. पण शेवटी आपल्या घेण्यालाही मर्यादा आहेतच ना. घेता किती घेशील दो कराने, हे आपल्याला लक्षात घ्यावंच लागतं.

Thursday, December 6, 2007

क्रेमलिनचा विजेता

रशियाच्या जनतेने संसदेच्या निवडणुकीत "युनायटेड रशिया' या पक्षाला मोठ्या बहुमताने विजयी केले आहे. मतदारांनी अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या नेतृत्वावर विश्‍वास दर्शविला आहे. साहजिकच पुतिन यांनीही या आनंदाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एका महान देशाच्या नेतृत्वपदी पुन्हा एक कणखर नेता पाहण्यास यानिमित्ताने मिळणार आहे.

पुतिन यांच्या विजयाबद्दल माध्यमांनी, विशेषतः पाश्‍चिमात्य माध्यमांनी नाराजीचा सूर काढला असून, रशियातील निवडणुकांच्या निष्पक्षपातीपणावरच संशय व्यक्त केला आहे. ही खास पाश्‍चिमात्यांची स्टाईल! त्यांना नेतेही पश्‍चिमेच्या रंगातील हवे असतात आणि लोकशाहीही पश्‍चिमेच्या ढंगाची हवी असती. मात्र खमकेदारपणे रशियाला पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या पुतिन यांनी पाश्‍चात्यांच्या या कोल्हेकुईकडे लक्ष न देण्याचे धोरण बाळगले आहे. त्यांच्या परिस्थितीत ते योग्यही आहे. खंडप्राय देशाच्या, तेही अण्वस्त्रधारी देशाच्या प्रमुखावर त्याच्या जनतेचा विश्‍वास असेल, तर त्याने इतरांकडून आपली भलामण होण्याची अपेक्षा का बाळगावी?

रशियातील निवडणूक "वेस्टमिन्स्टर' पद्धतीने झाली नाही, ही गोष्ट खरी आहे. ही पद्धतच जगात लोकशाहीचा एकमेव मार्ग आहे, असे ज्यांना वाटते त्यांची गोष्ट वेगळी. काही ठिकाणी लोकांना टोकाचा आग्रह करण्यात आला तर काही ठिकाणी त्यांना सामूहिकरीत्या मतदान करण्यास (पण विशिष्ट पक्षाला नव्हे!) भाग पाडण्यात आले, असे "बीबीसी' आणि "रॉयटर्स'च्या काही बातम्यांमधून दिसते. मात्र त्याच बीबीसीने "जोरदार टीकाही पुतिन यांची लाट झाकू शकत नाही,' अशीही "स्टोरी' दिलीच आहे.

व्लादिमीर पुतिन हे नाव घेताच डोळ्यांपुढे येतात धीर, गंभीर चेहऱ्याचे आणि मीतभाषी पुतिन. "केजीबी'शी संबंधित भूतकाळामुळे त्यांच्याबद्दल नेहमीच शंकेच्या सुरांत बोलल्या गेलं (आपल्याकडेही!). मात्र गेल्या पंचाहत्तर वर्षांमध्ये रशियाच्या कोणत्याही नेत्याने (किंवा जगातील कोणत्याही नेत्याने असंही म्हणता येईल) न केलेली गोष्ट पुतिन यांनी केली. ती म्हणजे अगदी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या रशियाला स्वतःच्या पायांवर उभं केलं. "पुतिन ः रशिया'ज चॉईस' या पुस्तकात रिचर्ड साकवा यांनी पुतिन यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेतला आहे. या पुस्तकात लेखक अलेक्‍झांडर झिनाविएव यांचे मत उद्‌धृत केले आहे. झिनोविएव यांच्या मते, ""पुतिन यांचे अधिकारपदी येणे ही रशियाच्या अमेरिकाकरणाला पहिला गंभीर विरोध होण्याचे निदर्शक होते.'' पुतिन यांच्या अंगचे गुण माहित असते तर त्यांना अमेरिका किंवा पुतिन यांच्या पुर्वसुरींनी सत्तेवर येऊ दिले असते असेही निरीक्षण झिनोविएव यांनी नोंदविले आहे.

पुतिन यांनी मात्र अमेरिकाविरोध हा आपला "ब्रांड' म्हणून विकसित केला नाही. आर्थिक सुधारणांबाबत काहीसे समजूतदारपणाचे धोरण बाळगतानाच आणि त्यावर काटेकोरपणे अंमलबजावणी करतानाच आपल्या राष्ट्राचे (देशाचे नव्हे!) स्वतंत्र अस्तित्व दाखवून देण्यासही त्यांनी कमी केले नाही. मॉस्को येथील थिएटरमधील ओलीस नाट्य असो (शंभर बळी) किंवा बेस्लान येथील ओलीस नाट्य असो (21 शाळकरी मुलांचे बळी), आपल्या धोरणापासून एक इंचही मागे न सरणारा नेता रशियन जनतेने त्यावेळी पाहिला. 2001-2002 मध्ये अमेरिकेने रशियातून आयात होणारा गहू निकृष्ट असल्याचे सांगून त्यावर बंदी घातली. त्यावेळी पुतिन यांनी लगोलग अमेरिकेतून येणाऱ्या कोंबड्यांवर बंदी घालून "हम भी कुछ कम नही' हे दाखवून दिले. पुतिन यांच्या कारकीर्दीकडे पाहिले असता ते नेहमीच विजेता ठरल्याचे दिसून येते. जुन्या सोव्हिएत संघातून नवा रशिया उभा करण्याची लढाई ते जिंकले, रशियन लोकांना स्वतःच्या पायावर उभे करण्यात त्यांना यश आले, आता निवडणुकांमध्ये स्वतःच्या पक्षाला विजय मिळवून देऊन त्यांनी नवा विजय मिळविला आहे. खऱ्या अर्थाने ते क्रेमलिनचे विजेते ठरले आहेत.
------


Tuesday, December 4, 2007

मृत्यूदूत मांजर...एक सत्यकथा

मांजर हा प्राणी आपल्याकडे काहीसा भीतीदायक मानला जातो. मार्जारवर्गातील वाघ, सिंह बिबट्या अशा प्राण्यांचं सोडा, अगदी घरातील मांजरीकडेसुद्धा संशयाने पाहिलं जातं. त्यात आत्मा, भूत अशा रहस्यात्मक गोष्टींशी त्याची सांगड घातल्या गेल्याने तर समस्त मार्जारवर्गच गूढतेत गुरफटला गेला आहे. अनेक तथाकथित रहस्यपटांमध्ये मांजरीचे दर्शन (तेही काळ्या) ‘बाय डिफॉल्ट’ आवश्यक मानल्या गेल्याने तर त्यात भरच पडली आहे. मात्र एखाद्या रुग्णालयातील मांजर आजारी रुग्णांजवळ जाऊन त्यांच्या मृत्यूचे भाकित करत असल्याचे सांगितल्यास कसे वाटेल. ही प्रत्यक्षात घडलेली कथा आहे आणि विशेष म्हणजे पाश्चिमात्य देशात सध्या घडत आहे. नुकतीच ही कथा मी रेडियो नेदरलँडसच्या साईटवर वाचली.

ही मांजर आहे अमेरिकेतील. ऱहोड आयलंड येथील प्रोव्हिडंस या शहरात स्टीर हाऊस नर्सिंग अँड रिहॅबिटेशन सेटर आहे. या रुग्णालयाने ऑस्कर या नावाच्या एका बेवारस मांजराला आश्रय दिला. या मांजराने मरणपंथाला लागलेल्या अनेक रुग्णांची भविष्यवाणी केली. इतकी की या मांजराच्या वर्तवणुकीवरून आता कोणाचा ‘नंबर’ लागणार आहे, हे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांना कळून येते.

ऑस्कर काय करतं, तर त्याला एखाद्याच्या मरणाचा वास आला, की त्या रुग्णाच्या खोलीबाहेर ते वाट पाहत थांबतं. यासाठी काही वेळेला अगदी घंटोगणती प्रतीक्षा करण्याची त्याची तयारी असते. एखाद्या नर्ससोबत ते खोलीत जातं आणि थेट रुग्णाच्या अंथरुणात उडी मारून बसतं. तिथं काही वेळ हुंगल्यासारखं करतं आणि तिथेच झोपीही जातं. यानंतर चार तासांच्या आत त्या रुग्णाची जीवनयात्रा संपलेली असते. बरं, हा पेशंट मरत असताना ऑस्करला तिथेच थांबायचं असतं. कोणी त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केल्यास ते निषेधाचा आवाज काढते.

अशा रितीने ऑस्करने आतापर्यंत पंचवीस रुग्णांना वरची वाट दाखविली आहे. त्यामुळे रुग्णालयांच्या कर्मचाऱयांच्या दृष्टीने त्याला खूप महत्त्व आहे. एखाद्या रुग्णाजवळ ते गेलं की नर्सेस त्या रुग्णाच्या कुटुंबियांना बोलावतात. खास बाब म्हणजे, ऑस्करच्या या जगावेगळ्या गुणाचे रुग्णाच्या कुटंबीयांना मात्र कौतुकच वाटते. ऑस्करच्या कौतुकादाखल रुग्णालयात एक फलकही उभारण्यात आला आहे.

इथपर्यंतचं सारं ठीक होतं. मात्र यातही गमतीचा भाग असा, की न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन या प्रतिष्ठेच्या नियतकालिकातही ऑस्करवर एक लेख प्रकाशित झाला. डॉ. डेविहड एम. डोसा यांनी हा लेख लिहिला आहे. त्यात ऑस्करचे विचित्र गुण आणि वर्तणूक यांची माहिती देतानाच, त्याचे स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला आहे. डॉ. डोसा यांच्या मते, मृत्यूप्राय व्यक्तींच्या शरीरातून काही विशिष्ट रसायने निघत असावीत आणि ऑस्करला त्यांचा गंध लागत असावा. ते काही असले, तरी या लेखावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मात्र नियतकालिकाच्या मते, डॉ. डोसा यांच्या लेखाला काही आधार देता येत नसला तरी त्याला नाकारते येणेही शक्य नाही.

या वादात मात्र ऑस्करचे काम अजून चालूच आहे. आता तो आणखी किती जणांना परलोकाचा रस्ता दाखवितो, ते त्यालाच माहित!.
--------


हेच ते मृत्यूची चाहूल लागणारे जगावेगळे मांजर

Wednesday, November 28, 2007

टीव्हीशप्पथ हसणार नाही.....

हॅलो...कोण? अच्छा तू होय? का रे कशाला फोन केला? नाही रे, नाही पाहिला तो प्रोग्राम- तुला माहितेय मी असले प्रोग्राम पाहत नाही. अरे, असतं काय त्या कार्यक्रमांमध्ये मला सांग ना? 'आनंदी आनंद गडे' असं हे जग असल्याचं आपल्या काही कवितांमध्ये म्हटलं आहे ना मग आता कोणाला आनंद कमी पडला म्हणून हे असले माकडचाळे रे?

...ए ए मला काय हसण्याची ऍलर्जी नाही हां. मलाही जोक कळतात. ....हो हसताही येतं. पण कोणीतरी उगीच डोळ्यापुढे उभं राहतं आणि काहीतरी अंगविक्षेप करून तुम्हाला हसायला भाग पाडतं, यात कसला विनोद? ....तू पाहतोस ना असले कार्यक्रम. मग तुलाच लखलाभ असोत रे ते.

...माझा आक्षेप? अरे, हे कार्यक्रम हसण्यासारखे असण्याऐवजी हास्यास्पद असतात, हाच माझा ऑब्जेक्शन आहे. नाही, विनोदाच्या नावाखाली असे आचरट उद्योग पूर्वीही होत असत. असरानी, जगदीप अशा लोकांची कारकीर्द त्यातच उभी राहिली माहितेय मला. पण दक्षिण भारतातून रिमेक केलेल्या चित्रपटांमध्ये कादरखान-शक्ती कपूर या जोडगोळीने काही काळ अशा प्रकारचा उच्छादच मांडला होता, हे तुला माहित नसावं कदाचित. हिंदी कशाला, आपल्या मराठीतही लक्ष्या-अशोक सराफ जोडीचे अनेक सिनेमे असेच नाहीत का? आता सुद्धा...

...थांब थांब... त्या उच्छादात आणि आताच्या टोळधाडीत एक फरक माहितेय का तुला? तो प्रकार थिएटरपुरता होता. आता हा टीव्हीतून घरात आलाय...अन हिंदी चॅनेल्सनी जे केलं ते मराठीतही झालंच पाहिजे, हा सॅटेलाईटचा नियम यांना पाळायलाच पाहिजे ना...त्यामुळे कोणी ‘हास्यसम्राट’ घ्या कोणी ‘हास्य़ दरबार’ घ्या चालू आहे ना बाबा. आता तुझ्यासारखे काही प्रेक्षक मिळाले की त्यांचे कार्य तडीस गेलेच म्हणून समज...मला कालच माझ्या ओळखीच्या एकाने विचारलं, “ तुम्ही पाहता का असले हसायचे कार्यक्रम?” मी सांगितलं, “ मी एकदा कार्यक्रम पाहायचा प्रयत्न केला होता. तेव्हा सुरवातीपासून शेवटपर्यंत हसत होतो. आता कधीतरी त्यात काय असते तेही पाहायचे आहे.”

....एक मिनिट, एक मिनिट...मला एक सांग, तू पु. ल. आचार्य अत्रे वगैरंची पुस्तके वाचली आहेस ना? मग तरीही तुला ही असली थेरं चालतात. नाही म्हणजे आपल्याकडे शिमगा वगैरेला असं काहीबाही चालत असतं...पण त्याचा असा बारमाही रतीब नाही घालत कोणी. अन हसण्यासाठी कोण कोण काय करतं, ते पाह्यलं का? म्हणजे ते पाहून हसू येण्याऐवजी किवच येते की रे. कोणी रेड्यासारखं रेकतं काय, कोणी बेंबीच्या देठापासून ओरडतो काय? एका कार्यक्रमात बालनाट्यातील राजा-प्रधानांसारखी वेशभूषा केलेले परीक्षक आहेत.

काहीच कळेनासं होतं. त्या हिंदीत तर भाड्याने आणल्यासारख्या मॉडेलच आणतात ना. हसण्यासाठी. म्हणजे विनोद फालतू असला तरी यांच्याकडे पाहून हसू यावं! काय रे ही खऱया विनोदाची ट्रजेडी?

तुला एक सांगू. सगळ्या प्राण्यांमध्ये हसू शकणारा प्राणी एकच माणूस. त्यातही कशाला हसावं आणि कशाला नाही, हे ज्याला समजतं तो शहाणा माणूस. तुला माहितेय का, अमेरिकेत एक विनोद आहे. कम्प्युटर कधीही माणसांची जागा घेऊ शकणार नाही, कारण साहेबांच्या विनोदावर हसण्याची कला त्याला येत नाही. तर कळालं ना...हसण्यासाठी आणखी जागा आहेत ना...साहेबांचे विनोद आहेत, चोवीस तास बाता मारणारे बातम्यांचे चॅनेल्स आहेत, गेला बाजार टीव्ही नको असेल तर एखाद्या वर्तमानपत्रातील वाचकांचा पत्रव्यवहार वाच...

...नको ना? ठीक आहे. तू नकोच वाचू. मी वाचेन आणि हसेनही. पण टीव्हीशप्पथ, ते कार्यक्रम पाहून हसणार नाही!

Wednesday, November 21, 2007

सिनेमातील "खेल खेल में'

चित्रपट आणि क्रिकेट दोन्ही आपल्याकडे लोकप्रिय आहेत. तरीही चंदेरी पडद्यावर त्याचे अभावानेच दर्शन घडते. अन्य खेळांची गोष्टच सोडा. आता गेल्या महिन्यात "चक दे इंडिया'ने हॉकीला केंद्रस्थानी ठेवून एक आकर्षक कथा सादर केली. या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तर चित्रपटात खेळ आणि खेळाडूंची अनुपस्थिती आणखी तीव्रतेने जाणवू लागली आहे. त्याचवेळेस खेळांवरील अन्य चित्रपट येत असल्यामुळे भारतात खास क्रीडापटांचा उदय होत आहे, हेही जाणवत आहे.

बॉलिवूडने खेळांना कधी पडद्यावर जागाच दिली नाही, असं नाही. "ऑल राउंडर', "बॉक्‍सर', "जो जीता वही सिकंदर' अशा चित्रपटांमधून खेळांचे दर्शन प्रेक्षकांना झाले. मात्र, ते केवळ तोंडी लावण्यापुरते. मुख्य भर बॉलिवूडच्या परंपरेप्रमाणे नाच गाणे, मेलोड्रामा आणि नायकाचे उदात्तीकरण याच चक्रावर होता. त्यामुळे चित्रपट खेळांशी संबंधित असूनही क्रीडा क्षेत्राला ते कधीही आपले वाटले नाहीत. प्रेक्षकांनीही अशा चित्रपटांचे कधी खुल्या मनाने स्वागत केल्याचा इतिहास नाही. त्यामुळेच की काय, या वाटेने जाणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांची संख्या अगदीच अत्यल्प म्हणावी अशी आहे. आपल्याकडे चित्रपटांचे खेळ होतात पण खेळांचे चित्रपट होत नाही, असं का?

खेळांशी संबंधित चित्रपटांचा आढावा घेतल्यास काय दिसते? अगदी तीस वर्षांपूर्वी आलेल्या "सावली प्रेमाची' हा चित्रपट घ्या. त्यात विक्रमवीर सुनील गावसकर नायक होता, हीच या चित्रपटाची ओळख. क्रिकेट खेळाडू संदीप पाटील याला हिरो म्हणून झळकावणाऱ्या "कभी अजनबी थे' या चित्रपटाची कथाही काही वेगळी नाही. त्यापेक्षा कुमार गौरव, विनोद मेहरा आणि रती अग्निहोत्री यांची भूमिका असलेल्या "ऑल राउंडर' या चित्रपटात क्रिकेटचे अधिक जवळून दर्शन झाले.

भारतात आर्थिक उदारीकरणानंतर आणि उपग्रह वाहिन्यांचे प्रमाण वाढल्यानंतर येथील प्रेक्षकांना सगळ्या प्रकारचे चित्रपट आणि मालिका पाहावयास मिळू लागल्या. त्यामुळे आपले हिंदी चित्रपटही बदलले. त्याचा एक चांगला परिणाम म्हणजे क्रीडापट अधिक तयार होऊ लागले. "लगान,' "इक्‍बाल', "चक दे इंडिया' आणि आता येऊ घातलेला "धन धना धन गोल' असे महत्त्वाचे क्रीडापट गेल्या पाच वर्षांतच आले आहेत, हे लक्षात घ्या. "स्टम्प्ड' सारखे केवळ क्रिकेटच्या क्रेझचा फायदा घेण्यासाठी आलेले चित्रपट वेगळेच! या ट्रेंडची सुरवात झाली सहा वर्षांपूर्वी आलेल्या "बेंड इट लाइक बेकहम' या चित्रपटाने. खरं तर हा चित्रपट इंग्रजी होता; मात्र त्यातील कथा भारतीय कुटुंबाची आणि फुटबॉलवेड्या युवतीची होती. त्यामुळे त्या चित्रपटाला मोठी लोकप्रियता लाभली. त्यानंतर अनेकांनी क्रीडा विषयावर चित्रपट काढण्याचे धाडस दाखविले आहे.

----------

(सकाळमध्ये १९ नोव्हेंबर रोजी प्रकाशित झालेल्या लेखाची ही संक्षिप्त आवृत्ती)

Monday, November 19, 2007

फटाक्‍यांचे बार आणि स्मृतींच्या पणत्या

स्मृतींचे हे भांडार दिवाळीच्या अन्य बाबींमध्ये जेवढे समृद्ध आहे, त्याहून जास्त समृद्ध ते फटाक्‍यांच्या बाबतीत आहे. अगदीच खरं सांगायचं म्हणजे फटाक्‍यांच्या बाबतीत माझ्या आठवणी खूप स्फोटक आहेत.न उडालेल्या बॉम्बमधील दारू वेगळी काढून घेऊन, ती पुन्हा पेटवावी तशी या आठवणी मी अनेकवेळेस अनेकांना पुन्हा पुन्हा सांगितल्या आहेत. तरीही त्यातली गंमत अजून जशास तशी आहे. या आठवणींबाबत काय सांगू? फटाक्‍यांच्या आतषबाजीची सुरवात दसऱ्याच्या दोन-चार दिवसांनंतर सुरू व्हायची. गल्लीत येता जाता बॉम्ब, टिकल्या आणि नागाच्या गोळ्या विकायला बसलेले छोटे छोटे स्टॉल दिसू लागले, की ठिणगी पडायची. त्यानंतर फटाक्‍यांसाठी वडिलांकडे हट्ट करावा लागे. तोही कितीसा? तर आठ आणे किंवा चार आण्याचा! अन्‌ तरीही वडिलांनी कधीही चर्चेच्या पहिल्या फेरीत मागणीला दाद दिल्याचे आठवत नाही. निवेदने, मोर्चे अशा शांततावादी मार्गांनी पदरात काहीही पडणार नाही, याची खात्री पटल्यानंतर एखाद्या वेळी निषेधाचा मार्ग अवलंबावा लागे. त्यानंतर मात्र वडील कानाखाली असा काही जाळ काढत, की ज्याचं नाव ते! त्यानंतर मग यथावकाश खरेदीचा पूर्वनियोजित कार्यक्रम पार पडे आणि घरात दारूगोळा येऊन पडे.

त्यानंतर प्राधान्य असायचं ते फटाक्‍यांच्या वाटपाचं. कारण पुढच्या सगळ्या गमतीचा आधार तोच असायचा. आपलाच दारूगोळा आपणच उडवून दिवाळी साजरी केली, तर त्या दिवाळीत काहीही अर्थ नाही असं मला अगदी मनापासून वाटतं. त्यामुळे स्वतःच्या वाट्याचे फटाके मागे ठेवून इतरांचे फटाके आधी उडविण्याची लज्जत मी खूपदा अनुभवली. मराठी व्यक्ती असल्याने बहीण-भावंडांवरच या गनिमी काव्याचा वापर करण्याचीही दक्षता मी अनेकदा घेतली. मात्र गल्लीतील अनेक मुले आणि शाळेतील मित्र यांनाही या प्रकारच्या लढाईचा मी अनेकदा प्रसाद दिला. अगदी बंदुकीच्या टिकल्यांपासून सुतळी बॉम्बपर्यंत अनेक प्रकारचे स्फोटके मी अशीच कमावली. त्यानंतर इतरांची रसद संपल्यावर आपल्या भात्यातले अस्त्र काढायचे आणि त्यांना वाकुल्या दाखवत ते उडवायचे...हा हा काय ते रम्य बालपण! आता तर काय, दिवसरात्र मी चॅनेलवर कुठेतरी गोळीबार, बॉंबस्फोट आणि हाणामाऱ्या पाहायचो...पण बालपणीच्या त्या स्वकर्तृत्वाच्या आतषबाजीची मजाच काही और!
दिवाळी म्हटलं, की नवे-नवे कपडे, काही चीजवस्तूंची खरेदी अशा अनेक गोष्टी असायच्या. माझ्या बालपणी तर दिवाळीची खरेदी म्हणजे एक जंगी कार्यक्रमच असे. "तुला नवे कपडे घ्यायचेत,' असं सांगून आई-वडील मला बाहेर घेऊन जायचे. त्यानंतर दुकानात गेल्यावर वडिलांचे कपडे घेऊन झाल्यावर माझ्या कपड्यांचा विषय अजेंड्यावर यायचा. आता जनरेशन गॅप म्हणा, का आणखी काही, पण आई-वडिलांची पसंती आणि माझी पसंती यात गुढी पाडवा आणि दिवाळीच्या पाडव्याएवढे अंतर पडे. या प्रामाणिक मतभेदांच्या फुलबाज्या मग कपड्यांच्या दुकानातच पडू लागत आणि वडिलांच्या रागाचा सुतळी बॉम्ब फुटल्यानंतर ते अग्निदिव्य पार पडे. अशारीतीने कोणाच्यातरी पसंतीने माझ्या कपड्यांची खरेदी होई, त्यावर भावंडे आणि शाळासोबती कॉमेंट्‌स करून मनोरंजन करून घेत आणि दिवाळी साजरी झाल्याचं समाधान मी करून घेई.
असो. गेले ते दिन गेले. एक वो भी दिवाली थी, एक ये भी दिवाली है...असं गाणं गात सध्या फिरत आहे. तूर्तास सांगायचं म्हणजे, माझी यंदाची दिवाळी खूप छान गेली आहे. या दिवाळीच्याही काही आठवणी तयार झाल्या आहेत. पण त्या आता म्हातारपणीच प्रकाशित कराव्या लागणार...त्याशिवाय "तरुणपणीच्या दिवाळीची म्हातारपणात मजा नाही,' अशा वाक्‍याला धार येणार नाही!

Wednesday, November 14, 2007

दिवाळी, केवळ आठवणींचीच...

दिवाळी म्हटली, की मला आठवणी सुचू लागतात. दरवर्षी दिवाळी आली, की आपल्या बालपणीची दिवाळी किती चांगली होती आणि त्या तुलनेत आजची दिवाळी किती फिकी आहे, याची जाणीव मला होऊ लागते. मराठी जगताच्या परंपरेनुसार भूतकाळातील दिवाळीचे वर्णन करण्यासाठीही मोठी संधी मिळालेली असते. खासगी गप्पा, सार्वजनिक गप्पा, वर्तमानपत्रे, वाहिन्या, गेला बाजार "पवनाकाठचा मावळा' किंवा "सा. गायब बहाद्दर' यांसारख्या दिवाळी अंकसुद्धा सध्याच्या दिवाळीपेक्षा बालपणीच्या दिवाळीत आपण काय दिवे लावले, याचीच जास्त खबरबात घेतात. मीही त्यामुळे दरवर्षी नवरात्र संपली की लेखणी सरसावून बसतो. (म्हणजे आताशा किबोर्ड सरसावून बसतो. जुन्या काळची पेन हातात घेण्याची मजा आता राहिली नाही!) लहानपणीच्या दोन-चार आठवणींचा खजिना कोऱ्या पानावर रिता करून, एखाद्या ठिकाणी तो छापून यावा यासारखी मजा शंभर सुतळी बॉंबमध्येही नाही. त्यामुळे दीपावली हा साजरा करायचा सण नसून तो आठवणी काढायचा सण आहे, असं माझं अगदी प्रामाणिक मत आहे.

यंदाच्या वर्षीही मी माझ्या आठवणींची पोतडी रिकामी करण्यासाठी सज्ज बसलो होतो. पण काय करणार, यंदा कोणीही मला पांढऱ्यावरती काळे करायला आमंत्रण दिले नाही. कोण्या पाहुण्याकडेही जायचा चान्स मिळाला नाही. त्यामुळे माझा अगदी कोंडमारा झाला आहे. पोट फाटेस्तोवर खाल्लेला दिवाळीचा फराळही आता पूर्ण पचत आला आहे, मात्र माझ्या आठवणींचं हे संचित काही जीरता जीरत नाही. त्यामुळे कुठेतरी पोट मोकळं करावंसं वाटतंय! त्यासाठीच हा लेखप्रपंच.

दिवाळी म्हटली, की आनंद, मांगल्य, सुख-समृद्धीच्या शुभेच्छा वगैरे वगैरे...शालेय अभ्यासक्रमात निबंध लिहिण्यासाठी पाठ केलेल्या या ओळी कोणत्याही वेळेस वापरायच्याच असतात ना? पण मला मात्र आता खरं खरं सांगायचंय...त्यामुळे मी खऱ्या आठवणी सांगतो. अन्‌ नीट सांगायचं तर मला लहानपणीच्या कोणत्याही दिवाळीच्या वेळेसचं काहीच आठवत नाही. शेजारच्या पिंटूचे फटाके चोरून तेच दिवाळीत उडविले, आजोळी गेलो असताना लाडू चोरून खाल्ले आणि ती चोरी पकडली गेल्यावर धम्मकलाडूही खाल्ले...अशा काही रंजक घटना सोडल्या तर दिवाळी म्हणजे एकदम संस्मरणीय असं काही आठवतच नाही हो!

एक तर दिवाळी म्हटली की लहानपणी मला हुडहुडी भरायची. कारण दिवाळीच्या चारही दिवसात सकाळी लवकर उठावं लागायचं. (ही शिक्षा अजूनही कमी झालेली नाही!) माझ्या सूर्यवंशी प्राण्याला रामप्रहरी उठायची गरजच काय, हा मूलभूत प्रश्‍न तेव्हा पडायचा. दिवाळीच्या सगळ्या फराळावर अन्‌ फटाक्‍यांवर ताण करणारा हा त्रासदायक प्रकार असायचा. बाहेर झुंजुमुजु व्हायच्या आत घरात झुंज सुरू व्हायची. आईच्या पहिल्या हाकेने युद्धाचा बिगुल फुंकला जायचा. दोन हाकांनंतर चादर अंगावरून काढल्यानंतर लढाई हातघाईवर यायची. या प्रयत्नात दोनदा लाथा झाडून मी अंगावर पुन्हा चादर घ्यायचो. ""मेल्या, दिवाळीच्या काळात तरी लवकर उठत जी नं. एरवी तर पडलेला असतोच दुपारपर्यंत अंथरुणात,'' अशी रणगर्जना कानावर आली, की मी पांढरे निशाण फडकावत असे. दिवाळीची सुरवात 'रागा-रागां'नी करायची असते व त्यासाठी तिकीटही काढावे लागते, हे मला खूप उशिरा अलीकडे कळाले. लहानपणी मात्र माझ्या सर्व दिवाळींची सुरवात रागातच झालेली आहे. अलीकडे मी पार पहाटेच्या वेळेसच झोपतो, मात्र लहानपणी त्या शिव्या खाण्याची मजाच काही और होती.

जी गोष्ट उठण्याची, तीच गोष्ट उटण्याची. तिळाचा तो लिबलिबित लगदा अंगावर चोपडून अंघोळ केल्याने पुण्य मिळते यावर माझा तेव्हाही विश्‍वास नव्हता आणि आजही नाही. मुळात थंडीच्या दिवसांत अंघोळ करण्याची गरजच काय, यावर एक बौद्धिक घेण्याची मला खूप इच्छा होती. पण त्या बौद्धिकाचे रूपांतर लगेच चर्चासत्रात झाले असते, अन्‌ घरातील सगळीच मंडळी त्या चर्चासत्रात माझ्यापेक्षा ज्येष्ठ वक्ते होण्याची शक्‍यता असल्याने माझ्या त्या शुभसंकल्पाला मी अनेक वर्षे आवर घालत होतो. आताही मी दिवाळीत उटणे लावतो, मात्र त्यावेळी त्या उटण्याचा जो कंटाळा यायचा, तो आता येत नाही. असो.

आणखी काही आठवणी "ब्रेक के बाद'...