Thursday, October 28, 2010

'कॉलगंधर्व' फोलपटराव

Blog post by devidas deshpande

आपल्या गजकर्णमधुर आणि शू-श्राव्य मोबाईल साधनांसह आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, म्हणजेच आपल्या कानाचे पडदे किती रिश्टर स्केलचा धक्का पचवू शकतात याची पडताळणी करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रवास करत आहेत 'कॉलगंधर्व' फोलपटराव . जरा कान इकडे करा पाहू. शिवाय बॅटरी सोडून वागणारे आपापले हँडसेट खिशातच ठेवा पाहू. आज ते आपल्याला काही अनमोल मार्गदर्शन करणार आहे.

आम्हीः फोलपटराव, अहो फोलपटराव. हा, आता तुमचं इकडं लक्ष इकडे गेलंच आहे तर आम्ही काही प्रश्न विचारावे का

फोलपटरावः मी नाही म्हण्लं तरी तुमी काय ना काय विचारणारच. तर विचारा काय तुम्हाला वाटत असंल तर. फक्त माझ्या वाजणाऱ्या मोबाईलबद्दल काही बोलू नका.

आम्हीः नाही म्हणजे कर्णाला जशी कवच कुंडले, तशी तुमच्या कर्णाला ही मोबाईलचे कवचच की. तर त्याबद्दलच बोलायचं होतं.

फोलपटरावः त्याचं असं आहे बगा, का दहा-वीस वर्षांपूर्वी माराष्ट्रात कर्णा नावाचा एक प्रकार होता. काही लोक त्याला लावूड स्पीकर म्हणायचं. त्याचाच अवतार आहे हा मोबाईल. म्हणजे जुना वाल्वचा रेडिओ जाऊन ट्रांझिस्टर, आन ट्रांझिस्टर जाऊन आता एफेम आला ना तसं. हे एफेम बाकी ऑटोतच जास्त ऐकू येतं. मग त्याला रेडिओ का म्हण्तात, रोडियो का नाही, हा आमचा म्हण्जे माझा प्रस्न आहे. (फोलपटरावांच्या तोंडात लालसर चोथा फिरताना दिसतो. भर गर्दीत शहर वाहतुकीची बस हेलकावे खाते आहे, तशी त्यांची लालसर जीभ त्या चोथ्यातून दंत्य आणि तालव्याचे आघाडी सरकार चालविण्याचा प्रयत्न करते.)

आम्हीः आमचा कर्ण प्राचीन काळातला होता. असो. अर्थ कळाला नाही तरी तुमच्या कानापर्यंत आमचे शब्दं पोचतात, याचा आम्हाला आनंद आहे. पण मंत्र्यांचं भाषण आकड्यांनी थबथबलेलं असतं, टीव्हीवरील मालिका नेहमी संकटग्रस्त असतात तसं तुमचे मोबाईल नेहमी आवाज का करतात. संगीताचा तुम्हाला असा रेल्वे किंवा बसमध्ये उमाळा का येतो?

फोलपटरावः अहो, संगीताचं काय म्हणता. ती आहेच भारी...

आपला नेम परत चुकला आहे. शब्द फोलपटरावांपर्यंत जातायत पण त्यांचा अर्थ पोचत नाही, असं वाटतंय. त्यामुळे आपण परत त्यांना तोच प्रश्न विचारूया. ते परत उत्तर देतायत...

फोलपटरावः त्याचं काय आहे, खरी कला लोकांमधेच फुलते. आपण जे ऐकतो, ते आणखी लोकांनी ऐकावं, त्यांनाही आनंद व्हावा, यासाठी असं पब्लिकमधे गाणं लावावंच लागतं. आता पब्लिकमधे लावल्यावर त्यांना नाराज का करावं, म्हणून ते दणक्यात लावावं लागतं. आनंद वाटल्याने वाढतो ना...

प्रश्नः हो, पण तुम्हाला जो आनंद वाटेल तो इतरांना वाटेलच असं नाही..

फोलपटरावः असं कसं बोलता तुम्ही. आनंद वाटून घेण्यावर वाढतो. आमच्यासारखे आनंदमार्गी जेवढे आहेत, त्यांच्या मोबाईलवर सार्वजनिक वाजणारी गाणी बघा एकदा. अगदी गिनी-चुनी गाणी दिसतील, म्हण्जे ऐकू येतील. याचा अर्थ बहुतके लोकांना ती आवडतात. आता थोड्या काही लोकांना नाही आवडत. ते गेले उडत. सोपं आहे. काय आहे साहेब, तुम्हा लोकांना पब्लिकमधे कसं राहावं ते कळत नाही. आता बगा, मागे ते वॉकमन नावाचं एक डबडं होतं. ते कुणी वापरत तरी होतं का. तुम्हाला वाटतं त्याची किंमत खूप होती म्हणून. तसं नाही. त्याचा आवाज होत नव्हता, त्यामुळे उठाव नव्हता त्याला. या माबोईलवर बगा आमची सोय झाली. परवा तर आमच्या गावठाणात भजनी मंडळाला नेहमीची लोकं आली मी. फक्त आमचं तात्या आणि त्यांचे दोन साथीदार. मी त्यांना दिला हँडसेट आणि लावली त्याच्यावर भजनं. त्यांना सांगितलं तुम्ही फक्त साथ द्या. आदल्या दिवशी गायब झालेली मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन विचारू लागली, का काल फारच जोरदार भजन झालं. आले तरी किती लोकं?

पुढचा प्रश्न विचारण्याआधीच मोबाईलराव उर्फ फोलपटरावांच्या हातातील खेळण्याला कंठ फुटतो. 'बेकरार प्यार है आजा,' असं कुठली तरी महिला आळवू लागते आहे. ती रडारड ऐकून थोड्या वेळाने आतडी तुटायला लागतात. आळवणे आणि आवळणे या क्रियापदांमध्ये इतका निकटचा संबंध का, हे आता आजूबाजूच्या लोकांना लक्षात येऊ लागतं आहे. या बयेनं आणखी अंत पाहण्यापूर्वीच शांतता प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न म्हणून पुढचा प्रश्न फोलपटरावांना विचारूया.

प्रश्नः असं चार लोकांमध्ये वाजवायचंच असंल तर एखादं प्रसन्न गाणं टाळावं, याची दीक्षा तुम्हाला कोण देतं?

फोलपटरावः त्याचं म्हणजे आम्ही बाळकडूच पिलेलो असतो म्हणा ना. अशी खुशीची गाणी आम्ही ठेवितच नाही ह्यांडसेटमधे. नकोच ती किटकिट. एकदा ह्यांडसेटमधेच ठेवली नाही तर वाजणार कशी? कार्डातच नाही तर स्पीकरात कशी येणार? काय? पब्लिकमध्ये असलो का अगदी दुःखी, रडकी गाणी वाजवायची. परवा असाच पीएमटीत जाताना मी वाजवत होतो. शिवाजीनगरला उतरताना एक जवान जवळ आला. मला काय म्हण्ला, का आजवर मी म्हण्जे तो नास्तिक होता. पण स्वारगेटपासून मी जी गाणी लावली त्यामुळे त्याने देवाचा धावा केला अन् त्यामुळं त्याच्या पदरी नामस्मरणाचं पुण्य पदरात पडलं. आता साधी गाणी लावली तर हे पुण्य मिळंल का सांगा?

वास्तविक आता प्रश्न खुंटायला आले आहेत. तरीही गप्प राहिल्यास परत कोणाचा तरी प्रेमभंग चव्हाट्यावर येऊन त्याच्या आत्महत्येची दवंडी पिटल्या जाईल, म्हणून आपण चर्चा चालू ठेऊया.

प्रश्नः मोबाईलवरून संगीतप्रसाराची तुमची ही तळमळ पाहून खरं तर भातखंडे आणि पलुसकर बुवांनीही हात टेकले असते व कानाची पाळी धरली असती. (जराशी वरच्या बाजूला!) तरीही आहे त्या यंत्रात तुम्हाला आणखी काय सोयी हव्या आहेत?

फोलपटरावः नाही, आहे हे मशीन मस्त आहे. पण आमचं या कंपन्यांना एकच सांगणं आहे का हॅडसेटसोबत हे कानात घालायचं कशाला देता...उगीच खर्च वाढतो. त्यापेक्षा विदाऊट हे (म्हणजे इअरफोन!)द्या तेव्हा हँडसेट आणखी स्वस्त होतील. पुन्हा मोबाईल विकतानाच त्यात अशी गाणी घालायला सांगितलं पाहिजे. म्हण्जे आमच्यासारख्या लोकांचे कष्ट वाचतील...

फोलपटराव त्यांच्या मागण्या मांडत असतानाच आपला स्टॉप आलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या असुरांबोसत मोकळे सोडून आपण त्यांच्या निरोप घेऊया. नमस्ते.

Thursday, October 14, 2010

मुख्यमंत्र्यांची ऐपत

Ashok Chavan chief minister of mahasrashtraअशोकाच्या झाडाला ना फुले ना फळे. या झाडाच्या नादाला लागू नका!

सुमारे एक महिन्यापूर्वी अजित पवार यांनी काढलेले हे उद्गार खोटे ठरविण्यासाठी की काय, मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आज अशोकाच्या झाडाला शब्दार्थ लागत असल्याचे दाखवून दिले. एखाद्या माणसाची नीयत म्हणजे त्या झाडाची ऐपत, असा एक वेगळाच अर्थ त्यांनी मराठी भाषेला प्रदान केला. इतके दिवस नीयत म्हणजे दानत असा अर्थ आम्हाला माहीत होता.

एका पत्रकार परिषदेच्या आधी गाफीलपणे बोलत बसलेल्या माणिकराव ठाकरे आणि सतीश चतुर्वेदी यांच्या संभाषणाला स्टार माझा वाहिनीने पकडले. त्यात माणिकराव म्हणतात, मुख्यमंत्र्यांची नियत नाही पैसे देण्याची. स्टार माझाने चव्हाणांना या बातमीवर प्रतिक्रिया विचारली, तेव्हा चव्हाण म्हणाले, “माणिकराव हिंदीत बोलत होते. त्यांना म्हणायचे होते मुख्यमंत्र्यांची ऐपत नाही दोन कोटी रुपये देण्याची.” हे वाक्य ऐकून तमाम महाराष्ट्राच्या काळजाचा ठोक चुकला असेल. देशातील सर्वात प्रगतीशील राज्याचा मुख्यमंत्री, ज्याच्या घरात वडील व मुलगा मिळून चार दशके सत्ता राबली, त्याची ऐपत नाही दोन कोटी रुपये देण्याची!

तशी अशोकरावांची परिस्थिती बेताचीच. ते त्यांनी व त्यांच्या गृहमंत्र्यांनीही अनेकदा जाणवून दिले आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये लोकराज्यच्या खाद्य विशेषांकात अमिताभाभींनीच मुलाखतीत सांगितले होते, "मी धान्य दळून आणते व तेच शिजवते.” आज मध्यमवर्गातही नित्याची झालेली विकतच्या पीठाची सोय ज्या कुटुंबाला परवडत नाही, ते कुटुंब अगदीच गरीब म्हणायचे. त्या मुलाखतीनंतर सहा महिन्यांनी आलेल्या निवडणुकीतही चव्हाण यांनी संपत्तीच्या विवरणात ट्रॅक्टर आणि ट्रॉली दाखविल्या होत्याच की! मुख्य म्हणजे, त्या विवरणात अशोकराव किंवा त्यांच्या संपूर्ण कुटंबात एकही मोटार नाही. कदाचित ट्रॅक्टर भाड्याने देऊन त्यांची उपजीविका चालत असेल.

महाराष्ट्रातील जमिनी विकून त्यातील वाटा जनपथावरील 'आम आदमीं'ना पोचविण्याचे व्रत घेतलेल्या राज्यकर्त्यांना (आठवा सिडको जमीन विक्री गैरव्यवहाराच्या बातम्या) दोन कोटी रुपये देणे जड व्हावे, ही मराठी मातीतील अस्सल 'ब्लॅक कॉमेडी' करून अशोकरावांनी मुख्यमंत्र्यांना कोट्या सुचण्याची परंपरा कायम ठेवली. छान आहे. याआधी बाबासाहेब भोसल्यांनी 'बंडोबा थंडोबा झाले' ही प्रसिद्ध उक्ती समाजाला दिली होती. बिचारे माणिकराव! त्यांना काय माहीत, मुख्यमंत्री कोट्यधीश असतात ते या अर्थाने!!

Thursday, September 30, 2010

सबको वाटणी दे भगवान!

sadhu

साठ वर्षे न्यायालयात रेंगाळलेल्या आणि 150 वर्षांपासून दोन धर्मांमध्ये वाद निर्माण करणाऱ्या एका खटल्याचा निकाल राजकीय तडजोडीतून अखेर देण्यात आला. खरं तर बाबरी वास्तूच्या जागी मंदीर होते, परंतु ते रामाचेच होते असे ठामपणे म्हणता यायचे नाही, असा निर्णय न्यायालय देईल, अशी माझी अपेक्षा होती. सकाळी मी तसेच मत व्यक्त केले होते. न्यायालयाच्या साखरपाकात घोळून दिलेली ही गोळी खटल्याशी संबंधित आणि असंबंधित अशा सर्वच लोकांना फायद्याची ठरणार आहे. कुठलाही धोका न पत्करता काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाने एकमेकांच्या फायद्याचा निर्णय न्यायालयाकडून वदवून घेतला आहे.

दुपारी चारच्या सुमारास एका बेकरीवर उभा होतो (ती मुसलमानांची होती हे वेगळे सांगायला पाहिजे का?) इंडिया टीव्ही नावाची एक दिव्य वाहिनी पाहत तेथील कामगार मंडळी उभी होती. त्यावेळीच पडद्यावर 'रामलला नहीं हटेंगे' अशा ओळी पाहिल्या आणि बहुतेक हा निर्णय हिंदुंच्या बाजूने लागला, असे वाटले.  पडलेल्या चेहऱ्याने त्या कामगारांनीही दूरचित्रवाणी बंद केला. नंतर निर्णयातील खाचाखोचा उघड होऊ लागल्या तशा त्यातील तडजोडी समोर येऊ लागल्या.

शहाबानो खटल्याच्या घोडचुकीनंतर तिचे परिमार्जन करण्यासाठी राजीव गांधी सरकारने 1986 साली अयोध्येतील वास्तूचे कुलूप उघडून तिथे पूजा करण्यासाठी परवानगी दिली. राजीव गांधींनी दिलेला तो सोपा झेल भारतीय जनता पक्षाने घेतलाच, शिवाय नंतर शतक झळकावून सत्ताही बळकावली. श्रीरामचंद्रांच्या (अव)कृपेने आठ वर्षे वनवास भोगलेली काँग्रेस पुन्हा आपले हात पोळून घेण्यासाठी तयार नव्हतीच. त्यातही राष्ट्रकुल स्पर्धांचं भजं, काश्मीर प्रश्नाचं भिजत घोंगडं, माओवाद्यांचा आगडोंब आणि तेलंगाणाची खिचडी अशा आम आदमीच्या प्रश्नांवर, शेपटीभोवती फिरणाऱ्या कुत्र्याप्रमाणे फिरणारे काँग्रेसप्रणीत सरकार कुठल्याही प्रश्नाचा सामना करण्यास मानसिकदृष्ट्या तयार नव्हतीच, नसणार. इकडे बाबरीच्या पतनानंतर माध्यमे आणि सेक्युलरांचे शिव्याशाप झेलणारी भाजपही आपल्यावरील कलंक पुसण्यासाठी संधीची वाट पाहात होतीच.

बिहार विधानसभेच्या निवडणुका एका महिन्यांनी होणार आहेत. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालात पुढील वर्षी त्या होणार आहेत व त्यासाठी सगळेच पक्ष आपापली हत्यारे परजून उभी आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत अवचित मोठ्या जागा पदरात पडल्यानंतर काँग्रेसने राहुल गांधींच्या नेतृत्वाचे डिंडिम वाजवायला सुरवात केली. यदाकदाचित या निकालामुळे कुठलाही एक मतदार वर्ग नाराज झाला आणि त्याची परिणती उ. प्र.मध्ये पराभवात झाली, तर युवराजांच्या राज्याभिषेकाला ते प्रतिकूल ठरले असते.

उ. प्र. मध्ये काँग्रेसची लढाई आहे ती बहुजन समाज पक्षाशी. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनेही तेथे मनोमन दुय्यम स्थान मान्य केले आहे. निकाल लागल्यानंतर दोन तासांच्या आत मायावतींनी माध्यमांसमोर येऊन केंद्र शासनाला जो गर्भित इशारा दिला, त्याची संगती ही आहे. या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, ही त्यांची भाषा काँग्रेसला कात्रीत पकडण्याचे द्योतकच आहे. मुलायम सिंहांचा बाहेरून पाठिंबा घेऊन त्यांना शह देण्यासाठीही काँग्रेसला या निर्णयाचा फायदा होईल.

डिसेंबर 1992 मध्ये कारसेवकांच्या कृत्यामुळे आणि फेब्रुवारी 2002 मधील गुजरात दंगलींमुळे भाजपवर धर्मांध पक्षाचा शिक्का बसला होता. तो पुसून काढण्यासाठी वापरलेला 'जीना'ही भलत्याच मजल्यावर घेऊन जात होता. आपण घटना व न्यायालयाच्या निर्णयाशी बांधील आहोत, हे दाखवून देण्यासाठी भाजपला अशा एखाद्या संधीची गरजच होती. अणू करारापासून वेळोवेळी भाजपने काँग्रेसशी जुळवून घेतल्याचे जे चित्र गेले एक वर्षभर दिसत होते, त्या मैत्रीचाही एक भाग या राजकारणात असू शकतो. शिवाय काँग्रेसच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहण्याची भाजपला आणखी चार वर्षे तरी गरज नाही. गेल्या आठवड्यात पी. चिदंबरम यांनी व आज लालकृष्ण अडवाणी आणि सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले ‘हा कोणाचा जय किंवा पराजय नाही,’ हे विधान कुठंतरी आतल्या समंजसपणाचेच लक्षण आहे.

आता राहिला वक्फ बोर्डाचा दावा. त्यांना या निर्णयाचा फारसा तोटा होण्याची शक्यताच नव्हती. एकतर ती वास्तू बांधली होती शिया मुस्लिमांनी. खटला लढत होते सुन्नी वक्फ बोर्ड. शिवाय निकाल त्यांच्या बाजूने लागला असता तरीही तिथे परत एखादी वास्तू उभारणे त्यांना अशक्यच होते. मग पदरात पडते आहे ती 1/3 जागा घेऊन न्यायव्यवस्थेच्या नावाने चांगभलं म्हणण्यात त्यांचंही काही नुकसान नव्हतंच. त्यामुळे न्यायालयाने वरपांगी हिंदुंच्या बाजूने, मुस्लिमांना न दुखावणारा आणि त्याचवेळेस आणखी कित्येक वर्षे हे लोणचं मुरवत ठेवता येईल, असा निकाल देऊन सगळ्यांचीच समजूत काढली आहे.

उच्च न्यायालयासारख्या संस्थेने राजकीय विचारातून असा निर्णय दिला असेल, हा विचार कितीही अतर्क्य वाटला तरी भारतात असं होऊ शकतं. सरतेशवटी, श्रीराम होते का नाही, याबद्दल श्री अरविंद एके ठिकाणी म्हणतातः-

ख्रिश्चन किंवा इस्लाम हे ऐतिहासिक घटना व व्यक्तींवर आधारित धर्म आहेत. त्यामुळे त्या ऐतिहासिक घटना किंवा व्यक्तींना धक्का पोचला, की त्या धर्मांची पाळेमुळे हालतात. हिंदूंमध्ये मात्र राम किंवा कृष्णासारख्या देवतांच्या ऐतिहासिक पात्रांवर भर दिलेला असतो. बहुसंख्य हिंदूंची आपल्या दैवतांवर श्रद्धा असते ती त्या दैवतांमधील तत्वांमुळे. उद्या राम किंवा कृष्ण अशा व्यक्तीच नव्हत्या, हे सिद्ध झाले तरी हिंदूंतील श्रद्धावंतांना काही फरक पडत नाही.

अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयानिमित्ताने श्रीरामाने एक अग्निपरीक्षा दिली आणि आपण 'होतो''  हे सिद्ध केले, हेही नसे थोडके.

Tuesday, September 21, 2010

जनजागृतीचा उत्सव 3

Ganpati  “बरं ते जाऊ दे. तुमच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाने पाण्याचे जे प्रदूषण होतं, त्याचं काय,” प्राध्यापक महाशयांचे युक्तिवाद आणि संयम दोन्ही संपत आला होता. त्यामुळे त्यांनी मला उत्सवकर्त्यांच्या गोटात ढकलून दिले. 

“ती एक वेगळीच गंमत आहे, सर. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार गणेश मूर्तींच्या विसर्जनाने वाहतं पाणी प्रदूषित होत नाही. तळं, विहीर इत्यादींमध्ये अस्वच्छता होऊ शकते. मात्र नदी किंवा समुद्रात प्रदूषणाची शक्यता खूप कमी असते. कसे ते सांगतो. त्याआधी तुम्हाला एक गंमत सांगतो. 2005 साली प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पाहणीनुसार, गणेशोत्सवाच्या काळात नदीचे प्रदूषण सर्वात कमी होते! वास्तविक प्लास्टर ऑफ पॅरिसने होणारी अस्वच्छता नदीत एकूण होणाऱ्या अस्वच्छतेच्या तुलनेत अगदीच कमी असते. कशी ते सांगतो. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्या वर्षी प्रकाशित केलेल्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील बहुतेक शहरे साठ जास्त टक्के पाणी कुठलीही प्रक्रिया न करता नदीत तशीच सोडून देतात. मुंबईत 80, पुण्यात 64, नाशिकमध्ये 47 तर नागपूरमध्ये केवळ 26 टक्के पाण्यावर प्रक्रिया केली जाते. पुण्यातील मुला-मुठेचं दुखणं ठसठशीत दाखविलं जातं. त्यामुळे तिथली परिस्थिती पाहिली, तर पुण्यात दररोज पाणीपुरवठा होतो 750 दशलक्ष लिटरचा. त्यात सांडपाणी निर्माण होतं 192 दशलक्ष लिटर. यातील सुमारे चाळीस टक्के पाणी, म्हणजे 48 दशलक्ष लिटर सांडपाणी दररोज पुण्याच्या सदाबहार नद्यांमध्ये सोडले जाते.

“आता आपण गणेश विसर्जनाच्या दोन दिवसांतील परिस्थिती पाहू. पुण्यात परवानगीशीर अशी 40,000 गणेश मंडळे असतात. त्यात घरगुती 20-25 हजार छोट्या मूर्तींची भर पडते. अशा एकूण 60-65,000 मूर्ती असतात. आठ ते दहा इंचांची एक मूर्ती 250 ग्रामच्या जवळपास असते. अशा एकूण मूर्तींचं वजन होईल दोन टन. पुण्यातील पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, मुठा-मुळेत दररोज 90 टनांचे सांडपाणी आणि कचरा वाहत जातो. याचाच अर्थ, गणेश मूर्तींचे तथाकथित प्रदूषण एकूण प्रदूषणाच्या दोन टक्क्यांहूनही कमी आहे. राहता राहीला प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा प्रश्न. PoP म्हणजे कॅल्शियम सल्फेट म्हणजेच जिप्सम. PoP संबंधात धोक्याचा सर्वात मोठा मुद्दा हा असतो, की पाणी आणि PoP शी संपर्क आल्यास त्वचा भाजली जाण्याची शक्यता खूप अधिक असते. आता मला सांगा, ज्या नदीचं तापमान 30 टक्केपेक्षा जास्त नाही, तिथे किती उष्णता निर्माण होणार? शिवाय, आपल्याकडे बहुतेक मूर्तींचं विसर्जन रात्री केलं जातं. त्यावेळी तापमान आणखीच कमी असतं. मूर्ती पाण्यात टाकल्यानंतर कोणी तिच्यासोबत वाहून जात नाही. त्यामुळं तोही मुद्दा निकालात निघतो. 

“कॅल्शियम सल्फेट पाण्यात विरघळण्यासाठी वेळ लागतो, विरघळतच नाही, असं नाही. त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे, आता लोकं परत शाडू आणि मातीच्या मूर्ती घ्यायला लागलेत. नैसर्गिक रंगांचा वापरही वाढतोय. त्यामुळं पाण्याचं प्रदूषण होतं, हाही मुद्दा पटणारा नाही. पुण्यातून जाणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे उजनीचं पाणी लोक वापरत नाहीत. तिथल्या उद्योजकांनीही आता शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी केलीय, हे तुम्हाला माहीतच असेल. या लोकांनी गणेश मूर्तींच्या नावाने खडे फोडण्याची गरज नाही.”

मग शेवटी मी म्हणालो, “असं बघा सर, जगात प्रत्येक देशाला अन् भारतात प्रत्येक राज्याला त्यांची ओळख पटविण्यासाठी एक उत्सव लागतोच लागतो. ब्राझीलचा कार्निवल, जर्मनीचा ओक्टोबरफेस्ट, अमेरिकेचा ख्रिसमस...आपल्याकडे कर्नाटकाला त्यांचा म्हैसूरचा दसरा आहे, बंगालला दुर्गा पूजा आहे, उत्तरेत रामलीला आहे, महाराष्ट्राला कुठला उत्सव आहे? छत्रपती शिवाजीनंतर महाराष्ट्राला अभिमानास्पद असं त्याचं एकमेव ओळखपत्र गणेशोत्सव हेच आहे. या उत्सवाने जेवढे कलावंत दिले, त्यांची कला जगविली तेवढे महाराष्ट्र सरकारनेही जगवले नसतील. काही लोकं तो बदनाम करतात, म्हणून तो संपवून टाकण्याची भाषा? हे म्हणजे भिंतीला तडे गेले म्हणून घरच पाडण्यासारखं झालं. असं समजा, की गणपती ही बुद्धीची देवता आहे. त्यामुळं बुद्धीहीन लोकांनाच त्याची गरज आहे आणि ते एकत्र येऊन, बुद्धी देण्यासाठी आकांत करतायत. सहन झालं नाही, तरी असा विचार केलात तर किमान तुम्हाला समाधान तरी लाभेल.”
(समाप्त)

लेखातील आकडे सृष्टी इको-रिसर्च इन्स्टिट्यूट, प्रदूषण नियंत्रण मंडळ व अन्य अभ्यासकांनी केलेल्या पाहणीवर आधारीत. पुण्यातील मुठा नदीतील गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी प्रदूषणाच्या पातळीत कुठलीही लक्षणीय वाढ झाल्याचे दाखवित नाही.

जनजागृतीचा उत्सव 2

वाजवा रे वाजवा!

Ganesh Festival "अहो पण या गर्दीत आपण कशासाठी सामिल व्हायचं? त्या टोळक्यात सामिल व्हायचं म्हणजे वेळ वाया घालवणं आहे. आपल्याला काही वैचारिक दर्जा आहे का नाही,” प्राध्यापक काही आपला मुद्दा सोडायला तयार नव्हते.

"अहो, पण तुम्ही त्यांच्यात सामिल होऊन वैचारिक आदानप्रदान करा ना. कदाचित त्या टोळक्यात आपणे एकटे पडू आणि त्यामुळे आपलं कोणी ऐकणार नाही, असं वाटत असल्यास तुमच्यासारख्या आणखी लोकांना सोबत घ्या ना. तसं पाहिल्यास, तुमच्यासारख्या विचारवंतांनी एकत्र येऊन आदर्श उत्सव साजरा केल्याचं मला कधी आढळलं नाही. त्यामुळं जे करतात त्यांना नावं ठेवण्याचा तुम्हाला, किंवा तुमच्यासारख्यांना अधिकार पोचत नाही. तुमच्या दृष्टीने जे रिकामटेकडे असतात, त्यांना मग जसं जमेल किंवा जे चांगलं वाटेल ते करतात. काही गोष्टी या काळाच्या गतीनुसार होतच असतात. वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, म्हणजे घरातल्या खोक्यात पोशाखी स्त्री-संचलन सुरू झालं नव्हतं, तेव्हा नाही का सगळी मंडळे दहा दिवसांत जुने हिंदी चित्रपट दाखवायचे. आता कुठलंही चित्रपट दाखवत नाही. हा बदल चांगला का वाईट, तुम्हीच विचार करा,” या उत्तराने त्यांचं समाधान होईल ही अपेक्षा नव्हतीच.

"दहा दिवसांच्या कीर्तनानंतर विसर्जन मिरवणुकीचा जो गोंधळ विसर्जन मिरवणुकीत होतो, त्याबाबत तुमचं म्हणणं ऐकायला आवडेल मला,” ते म्हणाले.

“मला काहीच म्हणायचं नाही. समाज किंवा कायद्याने आवाजाची पातळी निश्चित केलेली आहे. प्रश्न हा आहे की ती पातळी पाळली जाते का नाही, यावर लक्ष कोण ठेवणार? ज्यांनी लक्ष ठेवावे अशी अपेक्षा आहे ते ती ठेवतात का,” मी म्हणालो, “तुम्ही म्हणता तसं आवाजाचा त्रास तर सगळ्यांना होतोच. आता समजा मिरवणुकीच्या मार्गावर 100 घरे आहेत. तशी ती जास्तच असतील पण कमी नाहीत. यातील किती जणांनी आतापर्यंत एकत्र येऊन आवाजाचा त्रास झाल्याबद्दल तक्रार केली असेल? केवळ कुठल्या तरी 'मोफत पीठा'चं दळण काढलं म्हणजे जगात बदल होईल, या अपेक्षेला काही अर्थ आहे का? शिवाय, ध्वनिप्रदूषण झालं, त्याची विशिष्ट पातळी ओलांडली (70 डेसिबल) तर कारवाई करण्याचे अधिकार प्रदूषण मंडळाला आहेत. अशी कारवाई केल्याचे एक तरी उदाहरण आहे का आतापर्यंत. म्हणजे अहो, आमचे पोलीस तुम्हाला धरू शकत नाहीत, किंवा त्यांना तुम्हाला धरण्याची इच्छा नाही. म्हणून जरा चोऱ्या करणं बंद कराल का, असं तुम्ही कोण्या चोराला विचाराल का? तो जर तुमच्या विनंतीला मान देणार असतील, तर गणेश मंडळाचे कार्यकर्तेही तुमच्यासाठी आपला आवाज बंद करतील.”

एवढं सांगितल्याने प्राध्यापक ऐकतील, ही शक्यता नव्हतीच. मग पुढे सांगितलं, “गल्लीभूषण पुढाऱ्यांनी जन्म घेऊन या देशावर उपकार केल्याबद्दल त्यांच्या वाढदिवशी फटाके फोडून दवंडी पिटणाऱ्यांचा देश आहे हा. निसर्गनियमाला धरून वयात आल्यावर लग्न केल्याबद्दल सासऱ्याच्या पैशावर संपूर्ण शहराला तालबद्ध गाण्यांचा आविष्कार घडविणाऱ्यांचा देश आहे हा. तुम्ही गणेशोत्सव बंद केला म्हणून सगळ्या ध्वनिवर्धकांचे गळे धरतील, ही तुमची कल्पना आहे का? हा सगळा गलबला दुसऱ्या कोणत्या मार्गाने बाहेर पडणारच नाही, अशी तुम्हाला खात्री आहे का?”

त्यांना मला आणखी पिडायचं होतं, “सर, नियमानुसार काम हे भारतात सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नाव आहे. तुम्ही ज्याला गोंधळ म्हणतायत, तो घालण्यासाठी निमित्त लागत नाही आम्हाला. वन्य श्वापदांच्या वरचढ आवाजाचे भोंगे गाड्यांना लावून उंडारणाऱ्या माणसांच्या घरी काही राज्याभिषेक सोहळा चालू असतो, असं वाटलं का तुम्हाला? मोबाईलच्या बहुतेक उपयोगी 'कळा' माहीत नसणारे वीरही येथे आजूबाजूच्या लोकांना 'ताज्या गाण्यामोडी' ऐकवतात. एक खूप जुनी जाहीरात आठवते का तुम्हाला, 'आवाज ही नही करता' वाक्य असलेली. शांतता हे आमच्या येथे बिघाडाचे चिन्ह आहे, आणखी काय सांगणार?”

Wednesday, September 15, 2010

सल्मान-ए-वालेकुम!

प्यारे सलमान भाई,

हाडाबे-अर्ज. आता हा हाडाब कुठून आला, हा प्रश्न तुला पडणार. आधीच तुझ्या अगाध व समाजहितदक्ष मेंदूवर नाना काळज्यांचा भार पडलेला असताना, अशा क्षुल्लक कोड्यांनी त्यात भर घालण्यात काय हशील? त्यामुळे मीच सांगतो. अदाब-ए-अर्ज या सुंदर अभिवादनाचे हे खास मराठी रूप अर्ज. आता मराठी लोक एका विशिष्ट प्राण्याला घालवताना हा शब्द वापरतात, याची सांगड तू घालू नको. आमच्यामध्ये अद्वातद्वा बोलून कोणी स्वतःची (असो अथवा नसो) अब्रू घालवत असेल, तरी जिभेला हाड आहे का नाही, असं विचारतात. आताशा कोणी जुन्या म्हणी वापरत नाही. पण त्यांची आठवण अधूनमधून होत असते, एवढं खरं.

ही याद आम्हाला तुझ्याएवढी कोणीही आणून देत नाही, भाई. याबाबतीत तुझा हात अथवा जबान धरणारा कोणीही नसेल, हे लिहिताना माझी कलम जराही कचरत नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला किंवा जीभेला हाड नसणे, या मराठी भाषेतील वाक्यांना तमाम दुनियेपुढे उलगडण्याचा तू वसाच घेतलाय जणू. वीस वर्षांपूर्वी तू चित्रपटांत येतोस काय आणि एकामागोमाग फडतूस चित्रपट करतोस काय, सारंच अघटीत. पण ती उणीव लोकांना जाणवू देण्यासाठी तू जो काय आटापीटा करतोस, त्याची सर कोणाला नाही. तुझ्या जिभेचे दशावतार एव्हाना साऱ्या देशाने पाहिले आहेत. मग ते 'बॉलिवूडला हलविणारा मीच माफिया' अशी एका इमारतीत केलेली गगनभेदी मोबाईल घोषणा असो, किंवा विवेक ओबेरॉय आणि अभिषेक बच्चन यांची धुणी सार्वजनिक जागी धुण्याचे प्रसंग असो, थेटरातील कसर वास्तवात भरून काढण्याची एकही संधी तू सोडलेली नाहीस, याबद्दल तुला मनापासून शुक्रिया. या जिभेच्या नादी लागूनच नाही का राजस्थानात काही काळवीटांना तू मुक्ती दिली आणि मुंबईत काही लोकांना उंची गाड्यांखालून सफर घडवून आणलीस?

आता मी एवढं यारीमध्ये का लिहितोय? अरे, असं का करतोस? मागे मी तुझ्याबद्दल लिहिलं होतं, आठवत नाही का तुला? त्यावेळी हा जालीम समाज तुला कैदेत टाकायला निघाला होता. आता तुझ्या नावाने शिमगा वेगळा करताहेत. त्यासाठीच तुला पत्र लिहितोय. बाकी, या मधल्या काळात मी तुझ्याबद्दल काही लिहिलं नाही. पण ते यासाठी, की तुमच्या भाषेत – उस वक्त मैंने ऐरोंगैरोंपर लिखना छोड दिया था! पण भाई, या वेळेस तू चक्क पॉलिटिक्समध्ये घुसलास. पोरी आणि किस यापलिकडे दुनिया आहे, हे तरी तुला माहितंय का? अन् तू इतिहासाचा कीस पाडणार?

भाई, मी तुझ्यावर खूप रागावलोय. खूप म्हणजे खूप. अरे, क्यों का विचारतोस? नेहमीप्रमाणे तू तुझ्या विद्वत्तेचा उजेड पाडण्यासाठी आणि सखोल चिंतनातून आलेली काही मते मांडलीस. त्यावर गदारोळ होत होता. सगळं कसं स्क्रीप्टनुसार चाललं होतं. सलीमचाचांची हयात गेली स्क्रीप्टा लिहिण्यात पण त्यांनाही असलं टाईमिंग जमलं नाही कधी. गणेशोत्सवात पोलिस बंदोबस्तावर. नेते मतदारसंघात. सारखे गणपतींचे डेकोरेशन दाखवून डोकं दुखायला आलं. खबरा कुठून येणार? काश्मीर पेटलेला ठीकंय, पण त्यासाठी माणसे पाठवावी लागतात. ते कोण करणार. तुझी आयती बातमी आली होती. पाकिस्तानच्या चॅनेलशी केलेली गुफ्तगु. राज ठाकरेंनी तुझ्यासाठी शब्द टाकलेला. दुसऱ्या ठाकरेंनी 'ठोकरे'ची पोझ घेतली. सगळं कसं सेट झालं होतं. तीन दिवस आहे नाही तो जुन्या नव्या फिल्लमांचा स्टॉक चालवून मजा करण्याचा बेत आखत होतो आम्ही. अन् फु्स्स्स्स्स! तू कम्बख्त माफी मागून मोकळा!

अरे, टाईटल साँगलाच कोणी दि एन्डची पाटी लावते का? बोल ना मला. तुझ्यासारखा अवसानघातकी माणूस पाहिला नाही मी. भाई, ये तूने गलतईच किया. हमारे पेट पे लात मार दी.

अरे भाई, तू जो बोलला होता ना त्यात फार चूक नव्हतं. पण तू पडला फिल्म स्टार. कुठं आणि कसं बरळायचं, तुला कसं कळणार. तुला माहितंय, तु जे बोलला होता तसंच काहीसं कोण बोललं होतं? शिवसेनाप्रमुख!

Talking about those who lit candles in front of Taj Hotel after the last month's terror attacks, he said, "Those who party at the Taj have lost their watering holes. Hence this outrage. Where were these people when other terror attacks took place?"

हिंदुहृदयसम्राट तेच म्हणतात, मराठी हृदयसम्राट तेच बोलतात आणि मीही तेच बोलतो, भाई. मग तू आमच्या नावावर खपवायचं ना! तुला एक 'राज' सांगतो पत्रकारांचा. आपल्याला जे म्हणायचं ना, ते दुसऱ्यांच्या तोंडात कोंबायचा. कोट टाक, आरोप केला बोल. तुम्ही टपोरी लोकं पुण्याचे पेपर वाचत नाही, त्यामुळं हे सगळं शिकवावं लागतं.

और एक भाई, हे असं कुठंही बरळत जाऊ नको. खासकरून मुंबई हल्ल्याबाबत नकोच नको. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना तुझा निषेध करावा लागतो. बहोत बुरा लगता है भाई, मुझे नहीं उनको. अरे, इलेक्षनच्या वेळेस तुम्हा लोकांना फिरवावं लागतं त्यांना तुमच्या मतदारसंघात. नाहीतर कोण कुत्रं जाणार आहे प्रचार सभांना. गेल्या निवडणुकीतच नाही का तू औरंगाबाद का कुठल्याशा शहरात फिरला होतास? तू भले घरी गणपती बसवत असशील, पण उस्मानपुऱ्यातली मतं मिळण्यासाठी तुझा उत्सव करावा लागतो, भाई. एवढी मदत केल्यावर तुझाच निषेध करायचा म्हणजे काय वाटत असेल त्यांना, आँ? नाही केला निषेध तर वांधा व्हायचा भाई. तू राम गोपाल वर्माची एकही फिल्म केली नाही किंवा त्याच्या बरोबर ताजमध्येही गेला नाहीस, तुला काय कळणार भय काय असतं?

आता तुला देशभक्ताचं सर्टिफिकेट मिळालं, भाई, पण आमच्या रोजगार हमीचं नुकसान झालं, ते कोण भरून देणार? असो. पुढच्या वेळेस काळजी घे. म्हणजे माफी मागायची असली तरी जरा वेळ जाऊ दे. आम्हाला बातम्या करू दे. हजारो मुडदे पाडल्यांनतर पंचवीस वर्षांनी माफी मागूनही शेखी मिरविणारा देश आहे हा. तुला एक आठवडा कळ काढता येऊ नये?

आता तरी शहाणा हो. आता थांबतो. पत्र थोडं लांबलंय. तुला मुंबई हल्ल्यामागचे राजकारण कळते, म्हणजे लिहिता-वाचता येत असंल, असं समजून लिहिलंय. तुला जमलं नाही तर दुसऱ्यांकडून वाचून घे. आता परत तुझ्यावर इतक्यात लिहिन असं वाटत नाही. त्यामुळे ट्रेलरला फिल्म आणि बाईटला इंटरव्यू समजून घे.

तुझाच,

डीडी

Saturday, September 11, 2010

जनजागृतीचा उत्सव! –भाग 1

Ganesh Festival गणेशोत्सव "लोकमान्य टिळक आज असते, तर त्यांनी गणेशोत्सव बंद केला असता...," प्राध्यापक महाशय माझ्याशी तावातावाने त्यांच्या आवडत्या वाक्यावर आले होते. गायक जसा समेवर येतो किंवा एखादी बाई नवऱ्याबद्दल बोलताना ‘त्याला काही कळत नाही’ हे जसं आळवू-आळवून सांगते, तसं वरचं वाक्य आमच्या प्राध्यापक महाशयांचं त्यांच्यापुरतं चर्चेच्या निष्कर्षाला आल्याचं लक्षण आहे. साधारण जूनच्या पहिल्या आठवड्यात बेडकांचं वर्षागान सुरू होतं. जुलैच्या मध्याला शहरातील भूमिगत गटारे भूतलाला आच्छादून वाहू लागतात. ऑगस्टमध्ये निसर्गात ऊन-पावसाचा खेळ सुरू होतो आणि श्रावणानिमित्त बाजारात उपावासाच्या पदार्थांची आवक वाढते. या बाबींचा नैसर्गिक क्रम जेवढा ठरलेला, तेवढाच पोळ्याच्या जवळपास प्राध्यापकांचा गणेशोत्सवाच्या नावाने खडे फोडण्याचा कार्यक्रमही ओघाने येतो. त्यात एखाद दिवस इकडेतिकडे होईल...पण तो कार्यक्रम कधी रद्द झाल्याचं ऐकीवात नाही.

गणेशोत्सव 1893 पासून महाराष्ट्रात जनजागृतीचे काम करतो. त्यावेळी इंग्रजी राजवटीच्या विरोधात त्याने लोकांना जागे केले. आता गणेशोत्सव जवळ आला की वर्षभर शीतनिद्रा घेणारे समाजचिंतक जागे होतात. मग अत्यंत कळकळीची वर्तमानपत्रं जाहिराती लावून उरलेल्या जागेत, 'गणेशोत्सवाचे बदलते स्वरूप' किंवा 'उत्सव हवा, उच्छाद नको' अशा छापाचे लेख बसवितात. त्यामुळंच यंदाही प्राध्यापक महाशय येऊन त्यांची वार्षिक चिंता व्यक्त करू लागले, त्याचं आश्यर्य वाटण्याचा प्रश्नच नव्हता. आता त्यांनी उत्सवाच्या नावाने कंठशोष केलाच होता, तेव्हा त्यांना चहा पाजणं क्रमप्राप्तच होतं. तो वाफाळलेला द्रवपदार्थ घशाखाली गेला, तसा प्राध्यापकांचा पाराही खाली आला. त्यांच्या सगळ्या रणभेरी आधीच वाजून झाल्या होत्या. निकराचा प्रयत्न म्हणून त्यांनी आपले ठेवणीतले वाक्य काढले...तेच ते वर लिहीलेलं. हे वाक्य जसं त्यांनी पहिल्यांदा उच्चारलं नव्हतं, तसंच मीही पहिल्यांदा ऐकलं नव्हतं.

“नसता बंद केला लोकमान्यांनी...” प्राध्यापकांना हे वाक्य ऐकून एकदम 2400 वॅटची डॉल्बीची भिंत त्यांच्या खिडकीशी वाजावी, असा झटका बसला असावा.

"कशावरून?” त्यांनी प्रश्न टाकला.

“कारण लोकमान्य प्रयत्नवादी होते. त्यांच्या काळातही टगेपणा करणारी मंडळी कमी नव्हती किंवा वाया जाणारी युवाशक्तीही कमी नव्हती. पण त्यांनी त्या शक्तीचा उपमर्द न करता त्यांना गणेशोत्सवात आणले. मूळ पुंडपणा करणारे चापेकर बंधू हे याचे उत्तम उदाहरण आहे. त्यामुळे उत्सवाच्या स्वरूपाला नावे ठेवण्यापेक्षा त्यांनी त्यातून काहीतरी चांगले शोधण्याचा प्रयत्न केला असता. एवढा मोठा उर्जेचा साठा शंभर वर्षांपासून समाजात उपलब्ध असताना, त्याला नाक मुरडत दिवस काढणाऱ्या संभावितांना ते जमलेले नाही. पण म्हणून लोकमान्यांना त्यासाठी जबाबदार धरणे किंवा ते तुमच्यासारखे वागले असते, हे पटत नाही,” मी म्हणालो.

“हा उर्जेचा स्रोत?” प्राध्यापक महाशय वीज सळसळावी तसे उसळून बोलू लागले. “अहो, बेबंदपणा आहे सगळा. स्वैराचार आहे. ही पोरं दारू पितात, जुगार खेळतात. वर्गणीची खंडणी केलीय. मुळात करायचाय काय उत्सव. आता स्वातंत्र्य मिळालंय. प्रबोधन करायला शाळा आहेत. मग गणपती कशाला पाहिजे?”

“अहो, ती दारू पितात, जुगार खेळतात म्हणजे काय? त्यांना रोखणारे कोणी नाही म्हणूनच ना? ज्यांना आपण समाजातील सचोटी सांभाळू शकतो, असे वाटते त्यांनी मंडळात जाऊन असं गैरकृत्य करणाऱ्यांना जाब विचारावा. त्यांना थांबवावे. तळं राखील तो पाणी चाखीलच ना. तुम्हाला आपल्या वन/टू बीएचकेतून बाहेर पडायचं नाही. जे आपल्या झोपडीतून बाहेर पडतायत त्यांना वाट दाखविणारं कोणी नाहीय. तरीही काही ठिकाणी चांगली कामे होतच आहेत. राहिला प्रबोधनाचा प्रश्न. ज्या राज्यात इतिहासातील चित्रे लागली म्हणून दंगली होतात, पुतळे हालविण्यासाठी धुमश्चक्रीसारखी परिस्थिती निर्माण होते त्या राज्यात तरी प्रबोधनासाठी वाव नाही, हे मला मान्य नाही.”

“वर्गणीची खंडणी...तिचं काय?”

“असं आहे, प्रत्येक धर्मात किंवा संस्कृतीत व्यक्तीने समाजासाठी वाटा उटलण्याची संकल्पना आहे. शीख पंथात आपल्या वार्षिक उत्पन्नाचा 10 टक्के वाटा प्रत्येक व्यक्ती गुरुद्वाराला अर्पण करतो. मुस्लिम लोक 2.5 टक्के जकात देतात. फक्त हिंदु लोकंच याबाबतीत स्वार्थी आहेत. त्यामुळंच दररोज जिथे भ्रष्टाचाराच्या कथा बाहेर पडतात, त्या शिर्डीत वा तिरुपतीत धनांचे हंडे रिकामे होतात, अन् सामाजिक काम करणाऱ्या अनेक संस्थांना-मग त्या धार्मिक का असेनात-दारोदार अपमान सहन करत फिरावे लागते. एखादं मंडळ किंवा संस्था चांगलं काम करतेय, म्हणून तुम्ही स्वतः जाऊन वर्गणी दिलीय का कधी? अशा परिस्थितीत कोणी सार्वजनिक कामासाठी रक्कम मागत असेल, तेही वर्षातून एकदा तर ते देण्यात काय वाईट आहे. आता एकदाची पैसे देऊन कटकट मिटवू असा 'व्यापारी' विचार केला, तर मग लोकंही सारखी पैसे मागायला येणारच. कारण 'अजापुत्रं बलिं दद्यात्!'

"वास्तविक मोठी रक्कम देण्याऐवजी जर लोकांनी सांगितलं, की आम्ही थोडीशी रक्कम देऊ पण मंडळाच्या कामात सहभागी होऊ, तर वर्गणी खंडणी होणार नाही. उलट ती लोकं तुमच्याकडे येणंच बंद होईल. कारण तुमच्यासारखे सच्छील लोकं त्यांना नकोच आहेत. पण वर्गणी घेणाऱ्यांनाही माहीत असतं, की लोकांना पैसे देऊन मोकळं व्हायचंय. कटकट नको म्हणून कितीही आणि कितीदाही पैसे देण्याची लोकांची तयारी आहे. मग ते वारंवार येणारच. आधी दहीहंडी, मग गणेशोत्सव, नंतर नवरात्र...अहो सर, जिथे लोकं आपल्या हिसकावेल्या घरांसाठी पुढे येण्यास तयार नाहीत, तिथे किरकोळ वर्गणीसाठी भांडणं कोण विकत घेणार. मग अशा पुळचट लोकांकडून 'जबरा' वर्गणी घेतली नाही, तर त्या कार्यकर्त्यांना वेड्यात काढणार नाहीत का?”


टीपः सदरच्या लेखातील प्राध्यापक ही वास्तवातील व्यक्ती असून, त्यांच्याशी वेळोवेळी झालेल्या संवादावरच हा लेख आधारलेला आहे.