Thursday, May 5, 2016

यांचा महाराष्ट्र केवढा? - 2

मुखवटा भगवा, टिळा महाराष्ट्राचा
शिवसेना जर कोकणात रुजलेली असेल, तर भारतीय जनता पक्षही काही चांद्यापासून बांद्यापर्यंत विचार करतो, असे नाही.
भाजपने आपला विदर्भवादी चेहरा कधीही लपविलेला नाही. परंतु शिवसेनेच्या संगतीसाठी भगवा मुखवटा चढवून त्यावर अखंड महाराष्ट्राचा टिळाही लावलेला आहे. त्यामुळेच स्वतंत्र विदर्भाला मनापासून पाठिंबा असतानाही तसा जाहीर उच्चार भाजपच्या नेत्यांनी केलेला नाही. फार कशाला, पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी तर स्वतंत्र विदर्भाचे आश्वासन भाजपने कधी दिलेच नाही, असे घुमजाव पक्षाला हास्यास्पद करून टाकले.
ते काही असो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदावर आल्यानंतर आपल्या मातृप्रदेशावर ममतेची पखरण करण्याचा सपाटा लावला. इतका, की नागपूर आणि विदर्भाच्या पलीकडेही हे राज्य आहे आणि त्याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे, याचा विसर त्यांना पडला की काय, अशी शंका भल्या भल्यांना येऊ लागली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर हाच मुद्दा केला आणि पुणे किंवा अन्य शहरात गेल्यावर मुख्यमंत्री उर्वरित महाराष्ट्रावर अन्याय करत असल्याची टेप वाजवू लागले.
भाजप-सेना युतीच्या सरकारात भाजपच्या मंत्र्यांकडे नजर टाकली, तर पंकजा मुंडे आणि बबनराव लोणीकर हे दोघेच मराठवाड्यातील महत्त्वाचे मंत्री होत. परतूरच्या बबनराव लोणीकरांना राज्यमंत्रीपद मिळाले तर त्यांच्या जालना जिल्ह्यातील रावसाहेब दानवेंना प्रदेशाध्यक्षपद दिले आहे. पण त्यामागे जातीची गणिते आहेत. औरंगाबाद, परभणी, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांचा एकही प्रतिनिधी मंत्रिमंडळात नाही. उलट विदर्भाकडे तब्बल आठ मंत्रिपदे गेली आहेत.
मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ही मंत्रिमंडळातील दोन्ही महत्त्वाची पदे पहिल्यांदाच विदर्भाकडे गेली आहेत. त्यात गृहखाते स्वतः मुख्यमंत्र्यांकडे. त्याचाच परिणाम म्हणून विदर्भावर मेहरनजर सुरू झाली. राज्याच्या विविध भागांतील प्रकल्प आणि संस्था एकामागोमाग विदर्भात जाऊ लागले. पुण्यातील मेट्रो जागच्या जागी थांबली आणि नागपूरच्या मेट्रोची पायाभरणीही झाली. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) या राष्ट्रीय संस्थेचे विभागीय केंद्र औरंगाबाद ऐवजी नागपूरला हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर झालेल्या ‘आयआयएम’ची स्थापना औरंगाबादमध्ये होण्यासाठी आघाडी सरकारने प्रयत्न केले नाहीत. अन् फडणवीस सरकारने हे आयआयएम नागपूरला स्थापन करण्याचा निर्णय केला.
या सरकारच्या पहिल्या वहिल्या अर्थसंकल्पाने तर मराठवाड्याशी दुजाभाव केल्याचीच भावना निर्माण झाली होती. याचे कारण म्हणजे स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरसाठी १० कोटी रुपये, सीसीटीव्ही आणि स्मार्ट सिटीसाठी नाममात्र तरतूद या तीन बाबी औरंगाबादच्या खात्यात टाकण्याशिवाय या सरकारने मराठवाड्यातील बाकी सात जिल्ह्यांसाठी अक्षरशः काहीही तरतूद केली नाही. खरे तर मराठवाडा हा (विदर्भाच्या बरोबरीने) शेतकऱ्यांच्या आत्महत्येने गांजलेला प्रदेश. तरीही सरकारने त्याच्या तोंडाला पाने पुसली.
मुख्यमंत्र्यांच्या या विदर्भ प्रेमामुळे त्यांचा सहकारी पक्षच काय, खुद्द त्यांच्याही पक्षात अस्वस्थता पसरली. सगळ्या महत्त्वाच्या संस्था, केंद्रे नागपूरलाच कशासाठी,  मराठवाडय़ाचे काय होणार, असा प्रश्न औरंगाबादचे सेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी पहिल्यांदा उपस्थित केला आणि ही खदखद जाहीरपणे मांडली. त्यानंतर खुद्द मंत्री बबनराव लोणीकर यांनीही त्या विरोधात तोंड उघडले.
"मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती अत्यंत गंभीर असून सरकारकडून आवश्यक उपाययोजना केल्या जात नाहीत. रोजगार हमीची कामे बंद आहेत. सरकारची कामे समाधानकारक नाहीत," अशी उघड टीका त्यांनी केली. 

भाजपची ही पावले स्वतंत्र विदर्भाच्याच दिशेने पडत आहेत, असा अर्थ यातून कोणी काढला तर त्याला दोष कसा देणार? आणि तसे झाले तर महाराष्ट्रात असताना सगळी संसाधने विदर्भात घेऊन जायची आणि मग विदर्भ वेगळा काढायचा, हा भाजपचा डाव आहे का, हाही प्रश्न अनेकांना पडला. 

Wednesday, May 4, 2016

यांचा महाराष्ट्र केवढा? -1

गेले वर्षभर महाराष्ट्रात दोनच विषयांनी थैमान घातले आहे – एक दुष्काळ आणि दुसरा महाराष्ट्राचे विभाजन. विधानसभा निवडणुकीत काहींच्या इच्छेप्रमाणे, काहींच्या अपेक्षेप्रमाणे तर काहींच्या म्हणण्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला टांग मारली, तेव्हापासून प्रत्येक पक्ष दुसरा पक्ष अन्य प्रदेशाच्या जीवावर कसा उठला आहे, या आरोपाच्या भेंडोळ्या समोर ठेवतोय. आधी श्रीहरी अणे नावाच्या महाविदुषकांनी त्याला फोडणी दिली आणि आता राज ठाकरे यांनीही या वादाचा झेंडा हातात घेतला आहे. त्यांनी उडी मारली आहे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेलाही या वादात एक पात्र रंगवायचे आहे, असे गृहित धरायला हरकत नाही. एरवी मनसेच्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या दोन सभांमध्ये तोंडी लावण्यापुरते मराठवाडा-विदर्भाचा विषय घेणारे राज ठाकरे अचानक अखंड महाराष्ट्राबद्दल बोलू लागते ना.
एरवी सत्तेत आल्या दिवसापासून महाराष्ट्र अखंड ठेवण्याची ‘मर्दानगी’ बोलून दाखविण्याची एकही संधी उद्धव ठाकरे यांनी सोडलेली नाही आणि विदर्भाच्या ध्रुव बाळाला उत्तानपाद राजाच्या मांडीवर बसूच कसे देत नाहीत, अशी ईर्षा भाजपची मंडळी दाखवत आहेत. त्यात भरीस भर कायम लाडावलेली मुंबई सगळ्यांच्या गळ्यातील ताईत. म्हणून जवळपास प्रत्येक गावा-खेड्यातील जमिनीवरील आणि जमिनीखालील पाणी गेल्या वीस वर्षांत स्वकर्तृत्वाने आटवून दाखविल्यानंतर सगळ्यांना महाराष्ट्रप्रेमाचे भरते आले आहे.
नाही म्हणायला काँग्रेसला बहुतेक गांधी परिवारातील कोणी या विषयावर अधिकृत भूमिका मांडत नाही तोपर्यंत काही बोलायचे नसावे आणि विदर्भात किती मोकळी जमीन उरली आहे, त्यानुसार कदाचित राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका ठरेल.
स्वतंत्र विदर्भाची मागणी होते म्हणजे जणू काही फाळणीची मागणी, असा आविर्भाव करून जेव्हा ही मंडळी थैमान घालू लागतात तेव्हा गंमत वाटते. अन् जेव्हा तेव्हा 105 हुतात्म्यांची आठवण काढली जाते त्यांचा विदर्भाशी काही संबंध नाही, हेही कोणी सांगत नाही. यानिमित्ताने मतमतांतरांचा धुरळा मात्र उडतो आहे आणि बाष्कळ चर्चा चालू राहते. या सर्व आरोप प्रत्यारोपांचा लसावि काढायचा झाला तर दिसते ते हेच, की या प्रत्येकाचा महाराष्ट्र त्या त्या पक्षाच्या नजरेच्या टप्प्याबाहेर नाही. कसे ते पाहू.

कोकण-मुंबईत रुजलेला शिवसेनेचा अखंड महाराष्ट्र

विधानसभा निवडणुकीनंतर लगेचच शिवसेनेने भाजप हा विदर्भवादी पक्ष असल्याची आरोळी ठोकली, तेव्हा या गोंधळाला खरी सुरूवात झाली. विदर्भ महाराष्ट्रापासून तोडायचा भाजपचा डाव आहे, असा आरोपही खवळलेल्या वाघाने  केला होता. एवढे कशाला, विधिमंडळात जय विदर्भ असा नारा देणाऱ्या भाजप आमदारांची तुलना पाकिस्तान समर्थकांशी केली. जणू विदर्भ हा महाराष्ट्राचा अनादी अनंत हिस्साच आहे आणि तो महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणे हा देशाची फाळणी करण्याएवढाच जघन्य गुन्हा आहे.
महाराष्ट्र अखंड राहिला पाहिजे, यावर शिवसेनेचा प्रामाणिक भर आहे, मान्य. पण म्हणून शिवसेना संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या पदराखाली घेते आहे, असे दिसत नाही. शिवसेनेचा भगवा झेंडा राज्यभर फडकताना दिसतो, पण त्याचा मजबूत खांब मुंबई आणि कोकणाच्या लाल मातीचच रुजलेला आहे, हे चित्र काही पुसल्या जात नाही. किमान त्या पक्षाच्या नेतृत्वाचे वागणे तरी हा ठसा पुसू देत नाही.
विधानसभा निवडणुकीत शिवसेनेला मराठवाड्यात २८ पैकी ११ जागा मिळाल्या, विदर्भात ३ जागा आणि मुंबईत ३६ पैकी १४ जागा मिळाल्या. म्हणजेच शिवसेनेचा मराठवाड्यातील विजयाचा टक्का अधिक आहे. औरंगाबाद महापालिका गेली कित्येक वर्षे जनतेने शिवसेनेलाच बहाल केली आहे. यंदाही ती परंपरा कायम राहिली आहे. पण विधानसभेतील पक्षाच्या गटनेत्यांची नावे - नारायण राणे, रामदास कदम, सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे - पाहिली तर मुंबई आणि कोकणाच्या पलिकडचा महाराष्ट्र नसल्यासारखाच आहे, असा शिवसेनेचा होरा आहे की काय, असा प्रश्न पडतो.
शिवसेनेच्या पाच कॅबिनेट मंत्र्यांमध्ये मराठवाडा व विदर्भातील एकही नाव नाही. पाच राज्यमंत्र्यांमध्ये तीन म्हणजे दादा भुसे, संजय राठोड आणि विजय शिवतारे मुंबईबाहेरचे आहेत. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम आणि दक्षिण महाराष्ट्रालाच जिथे हातचे राखूनच दिले तिथे या दोन प्रदेशांची काय पत्रास.
शिवसेनेच्या संकेतस्थळावर त्यांच्या नेत्यांची यादी दिली आहे. त्यात आठ नावांपैकी एकही मराठवाड्यातील नाही. पक्षाच्या 29 उपनेत्यांपैकी केवळ आठ जण मुंबई-ठाणे या पट्ट्याबाहेरील आहेत. ही यादी आणखी लांबविता येईल. पण या सगळ्याचा मथितार्थ हाच, की शिवसेनेच्या दृष्टीने सर्व प्रतिभा आणि विश्वासार्हता मुंबई व कोकणात एकवटलेली आहे. अन् तरीही विदर्भाने (वा पुढेमागे मराठवाड्याने) वेगळे होण्याची भाषा करू नये, ही अपेक्षा अतिरेकी झाली.

Wednesday, April 6, 2016

एक पुरस्कृत भणंग!

सात दिवसांपूर्वी, 30 मार्च रोजी, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनसजवळ आमची गाडी फिरत होती. स्टाफ कॉलेज या नावाने 'प्रसिद्ध' असलेली एक उपेक्षित इमारत आम्हाला हवी होती. कारण थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्य पत्रकारिता पुरस्कार स्वीकारण्यासाठी मला 'तयार' व्हायचे होते. एखाद्या रोमांचक सामन्यातील शेवटच्या षटकांमध्ये चुरस निर्माण व्हावी, तसे अगदी तास-अर्धा तास आधी आम्हाला ती जागा सापडली आणि यथावकाश आम्ही कार्यक्रमस्थळी पोचलो. त्या10-15 मिनिटांत थोडी फार पायपीटही झाली आणि प्रत्यक्ष पुरस्कार स्वीकारण्याआधी 20 वर्षांपूर्वीचा पुनःप्रत्यय मी घेऊ शकलो.
     याच परिसरात अशाच प्रकारे मी कधी काळी भटकलो होतो. फक्त त्यावेळी घर सोडून आलो होतो आणि वाट फुटेल तिकडे रस्ता शोधत फिरत होतो. गेली 15 वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात जे काही काम मी केले असेल नसेल, त्याची एक गोळाबेरीज म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना एक भणंग म्हणून केलेली ही भटकंती माझ्या डोळ्यासमोर होती. हा पुरस्कार म्हणजे एक प्रकारे त्या भणंगगिरीला मिळालेली दादच म्हणावी लागेल. वीस वर्षांच्या कालखंडाची दोन टोके जोडणारे एक वर्तुळ जोडले गेले.
         एरवी प्रत्येक पुरस्कारामागे असते त्या प्रमाणे याही पुरस्काराचे श्रेय आईचे कष्ट, वडिलांचे आशीर्वाद तसेच मोठ्यांचे मार्गदर्शन आणि मित्रांचे सहकार्य यांना आहेच. त्याच प्रमाणे नांदेडमध्ये माझ्या घरानंतरचे घर असणारे डॉ. राम मनोहर लोहिया वाचनालय व ग्रंथालयालाही त्याचे श्रेय आहे. वाचन-लेखन ही एक प्रतिष्ठेची बाब आहे, हे वाचनालयानेच मला शिकविले.
     मात्र श्रेय सुफळ होण्यासाठी सुद्धा योग्य वेळ यावी लागते.  बरोबर 25 वर्षांपूर्वी नांदेडमधील एका गणेशोत्सव मंडळाच्या निबंध स्पर्धेत पहिला क्रमांक मिळाला होता. त्यानंतर मिळालेला हा थेट दुसरा पुरस्कार. मध्ये कुठलाही थांबा नाही. त्यामुळे या पुरस्काराचा आनंद अंमळ जास्तच. शिवाय कुठल्याही वृत्तपत्राच्या नावाखाली नव्हे, तर सरकार दरबारी सोशल मीडिया लेखन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्लॉग लेखनासाठी हा पुरस्कार मिळालेला असल्यामुळे त्याचे कौतुक अधिक! गेल्या दीड-एक वर्षात मदुराईची मीनाक्षी, कन्याकुमारी, तिरुवन्नामलै, पद्मनाभस्वामी (तिरुवनंतपुरम), गोविंद देवजी(जयपूर), कोच्चीतील सेंट फ्रान्सिस चर्च, अमृतसरातील हरमंदिर साहिब आणि नांदेडमधील सचखंड हुजूर साहिब अशा नाना तीर्थस्थळांवर डोके टेकवून आलेलो आहे. (अर्थात् पुरस्कारासाठी नाही!) त्यामुळे यातील नक्की कोणता देव पावला आणि हा मान माझ्या पदरी पडला, हे अजून नक्की कळायला मार्ग नाही. मात्र 'ज्याने पाहिला नाही दिवा त्याने पाहिला अवा', अशा पद्धतीचा हा सन्मान मिळाल्यामुळे हरखून जायला होते हे नक्की.
     मी इंग्रजीत ब्लॉगलेखन सुरू केल्याला यंदा दहा वर्षे पूर्ण होतील तर मराठीला नऊ वर्षे. मराठीत ब्लॉग लिहिणाऱ्या (अन् अद्याप लिहिणाऱ्या) पहिल्या काही पत्रकारांपैकी मी एक. वृत्तपत्रात काम करत असलो, तरी तेथे कामात काही राम नव्हता. मंदिराचा पुजारी सर्वात आधी नास्तिक होतो, असे म्हणतात. त्याच प्रमाणे पेपरमधील कर्मचारी सर्वात आधी निराश होतो, असे म्हणायला हरकत नाही. या क्षेत्रात मी आलो ते लेखनाच्या हौसेखातर आणि त्यालाच वाव मिळत नसल्याचे पदोपदी दिसून येत होते. भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे ‘जीर्णमङ्गे सुभाषितम्’ अशी ही अवस्था होती. हे जाणवल्यानंतर आधी इकडे-तिकडे लिहिण्यास सुरूवात केली आणि त्यानंतर हे नवे, मुक्त आणि प्रभावशाली माध्यम हाताशी आल्यानंतर ती संधी मी हातोहात घेतली. त्याची ताकद वगैरे ओळखणे राहिले बाजूला, पण आपल्या मनमुराद अभिव्यक्तीसाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळते आहे, याचाच आनंद जास्त होता. म्हणूनच इतरांनाही मी या माध्यमाची कास धरण्याचा आग्रह नेहमीच करत आलेलो आहे. त्यातूनच मी आणि आशिष चांदोरकर यांनी ब्लॉग लेखनाचा मार्ग चोखाळला. आम्ही काम करत असलेल्या संस्थेत आमची ती विद्रोही चळवळच होती म्हटले तरी चालेल. योगायोगाने गेल्या वर्षी त्याला हा पुरस्कार मिळाला आणि मागोमाग माझा क्रमांक लागला.
      सुदैवाने अगदी आरंभापासून माझ्या लेखनकामाठीला प्रतिसाद मिळत गेला आणि हुरूप वाढत गेला.
     तीन वर्षांपूर्वी औपचारिक नोकरी सोडल्यानंतर मुक्त पत्रकार म्हणून काम करायला सुरूवात केली. या काळात याहू, रिडीफ आणि बीबीसीसारख्या संस्थांसाठीही काम केले. त्याच वेळेस माझा मित्र विश्वनाथ गरूड याने लोकसत्ता.कॉमवर ब्लॉग लिहिण्याचा प्रस्ताव दिला आणि साधारण मार्च 2014 पासून मी तेथे ब्लॉग लिहायला सुरूवात केली. राजकीय घडामोडींवर आधारित असा तो ब्लॉग होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात लिहिलेल्या या नोंदींना प्रचंड प्रतिसाद मिळाला. पंधरा वर्षांच्या पत्रकारितेत आणि 10 वर्षांच्या ब्लॉगलेखनात मी कधीही एखाद्या विशिष्ठ विचारसरणीचा वा पक्षाचा प्रसार किंवा भलामण केलेली नाही. त्या निष्पक्षतेवर आणि सचोटीवर या प्रतिसाद व प्रतिक्रियांनी शिक्कामोर्तबच केले.
     त्यानंतर विश्वनाथच्याच पुढाकाराने लोकसत्ता.कॉमवर जानेवारी 2015 पासून नवीन एक ब्लॉग लिहायला सुरूवात केली. 'कवडसे' नावाचा हा ब्लॉग साधारण ऑक्टोबरपर्यंत दर आठवड्याला मी लिहित होतो. माझ्या आवडत्या भाषा आणि संस्कृती विषयावरील विविध घडामोडींवर नोंदी यात लिहिल्या. याही ब्लॉगला मिळालेला प्रतिसाद भारावून टाकणारा होता. अनेक ठिकाणाहून मेल यायला लागले, चांगल्या चांगल्या लेखकांकडून दखल घेतली जाऊ लागली. कधी कधी मांडलेली मते आवडली नाहीत, तर थेट नाके मुरडणाऱ्या प्रतिक्रियाही यायला लागल्या. ‘एरवी तुम्ही बरे लिहिता, पण यावेळी गंडलात,’ असेही काही लोक थेट सांगू लागले. एका पातळीवर अहंकार सुखावणारा आणि दुसऱ्या पातळीवर मनावर दडपण आणणारा असा हा अनुभव होता. भाषा हा मराठी वाचकांच्या किती जिव्हाळ्याचा विषय आहे, हे त्यातून अधोरेखित होत होते.
     म्हणूनच वर्ष 2015 साठी दहा ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांच्या समितीने या नोंदींची निवड पुरस्कारासाठी केली, तेव्हा मनाला खूप समाधान झाले. पुरस्काराची मोहर तर आज उमटली आहेच, परंतु खरोखर या नोंदींचा दर्जा उत्तमच होता, हा दावा मी आजही करू शकतो. त्यासाठी लोकसत्ता.कॉम आणि विश्वनाथचे आभार.
    या शासकीय पुरस्कारामुळे एक भणंग पुरस्कृत झाला आहे, हे सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच!

Friday, March 18, 2016

ओवैसी अन् सेक्युलरांना जपानी चपराक!

'भारत माता की जय' म्हणायचे का नाही, यावर भाष्य करून ओवैसीने दाखवून दिलेली जनुकीय गुंतागुंत आणि देशाची मानचिहे आदरासाठी नसून खिल्ली उडवण्यासाठी आहेत, अशी 'जेएनयू'कीय अक्कल पाजळणारी पिलावळ, यांनी गेली काही दिवस बातम्यांच्या बॉक्स ऑफिसवर कब्जा केला आहे. राष्ट्रवादी गँग आणि दीडशहाणी गँग एकमेकांसमोर उभ्या आहेत. त्या कधी एकमेकांच्या उरावर बसतील काही नेम नाही.
अशा वातावरणात पुण्यात हिंदी भाषेच्या एका कार्यक्रमाची अध्यक्षता एक जपानी प्राध्यापक करतो. सर्व वक्त्यांची भाषणे झाल्यावर उठतो आणि साधे-सरळ परंतु थेट भिडणारे भाषण करतो. आणि भाषणाच्या शेवटी ‘मी भारत माता की जय‘ म्हणत आलो आहे आणि म्हणत राहणार, ‘असे सुनावून तमाम सेक्युलरांचे नाक ठेचतो.
हे दृश्य "देशभक्तीचा ठेका घेतलेल्या" रा. स्व. संघ किंवा तत्सम टिळाधाऱ्यांच्या कार्यक्रमातील नव्हते. उलट काँग्रेस नेते असलेल्या उल्हास पवार यांच्या ताब्यातील महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभेच्या कार्यक्रमात घडलेला हा प्रसंग आहे.
'हिंदीचे जागतिकीकरण आणि शक्यता' या विषयावर राष्ट्रसभा सभेच्या वतीने एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्रा. हिदेआकी इशिदा  होते. राहुल गांधींपेक्षा चांगल्या दर्जाच्या हिंदीत, अन् तेही स्वत:च्या मनाने, केलेल्या भाषणात प्रा. इशिदा यांनी जपानी लोकांमध्ये हिंदी, संस्कृत व एकूणच भारताबद्दल असलेल्या प्रेमाचे वर्णन केले. त्यांच्या खुशखुशीतपणाला उपस्थितांनी चांगलीच दाद दिली.
“अनके शतकांपूर्वी बाहेरच्या आक्रमकांनी तुमच्यावर आक्रमण केले आणि येथील खडीबोलीची (हिंदी) मोडतोड केली. त्यावेळच्या देशभक्तांना ही बाब रूचली नसणारच. आक्रमकांनी केलेल्या सरमिसळीला त्यांनीही आक्षेप घेतला असणारच. मात्र नंतर उर्दू ही स्वतंत्र भाषा काढून यावर मार्ग शोधण्यात आला. त्यानंतर महात्मा गांधींनी हिंदुस्तानी ही भाषा संपर्कभाषा म्हणून रूढ केली. आज तुम्ही जिला हिंदी म्हणता, ती हीच भाषा होय. म्हणून आज इंग्रजी शब्दांच्या मिश्रणाने तुम्ही का बिचकता हेच मला कळत नाही. हीच उद्याची प्रमाणभाषा आहे,” असे सांगत त्यांनी परकीय माणूस भारतीय भाषांच्या चर्चेकडे कसा पाहतो, याची चुणूक दाखविली. जपानमध्ये परकीय भाषांच्या लोकप्रियतेत हिंदी तिसऱ्या क्रमांकारवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर भाषणाच्या शेवटी त्यांनी 'मला आवर्जून एक उल्लेख करायचाय. मी भारतीय संस्कृतीकडे आदराने पाहतो आणि म्हणून मला 'भारत माता की जय‘ म्हणण्याची लाज वाटत नाही. मी ते म्हणत राहणार," असे ठणकावून सांगितले.  त्यांच्या या समयसूचकतेला उपस्थितांनी दाद दिली नसती तरच नवल. अन् तोपर्यंत हिंदीच्या आडूनआडून मोदींवर तोंडसुख घेणाऱ्यांची तोंडेही पाहण्यासारखी झाली होती!

Thursday, February 11, 2016

संत्रस्त अहमदियांची कैफियत

साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या दालनात अहमदिया पंथाच्या स्टॉलवर आम्ही जरा रेंगाळलो. मुस्लिमांमधील एक पंथ असलेल्या  अहमदियांना पाकिस्तानात धर्मबाह्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा तिथे अतोनात छळ होतो. मुस्लिमांची प्रार्थनास्थळे वापरण्यासही त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. एकवेळ हिंदू चालतील परंतु अहमदिया नकोत, असा तिथे दंडक आहे. एवढे वाचून-ऐकून माहीत होते. मात्र प्रत्यक्ष अहमदियांना त्याची कारणे विचारण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. ती संधी इथे मिळाली.
जगातील बहुसंख्य धर्मांच्या बहुतेक पंथांप्रमाणे अहमदिया पंथाचा जन्मही भारतातलाच. पंजाबातील लुधियाना येथे त्यांचे मुख्यालय आहे. मुस्लिम धर्मियांच्या मान्यतेप्रमाणे मुहम्मद पैगंबर हे जगातील शेवटचे प्रेषित होत. त्यांच्यानंतर कोणीही स्वतःला प्रेषित म्हणवून घेऊ शकत नाहीत. मात्र पैगंबरांच्या शिकवणीचा ग्रंथ असलेल्या हदीसमध्ये असे उल्लेख आहेत, की त्यांच्यानंतरही या जगात प्रेषित येतील. हे प्रेषित कधी येतील आणि त्यांची लक्षणे काय असतील, हेही हदीसमध्ये दिलेले आहे. त्यानुसार 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाबात जन्मलेले मिर्झा गुलाम अहमद कादियानी हे नव्या काळातील प्रेषित होत, अशी अहमदियांची मान्यता आहे. आज भारतात सुमारे 2 लाख अहमदिया पंथीय असून सुन्नी पंथाचा ते भाग आहेत.
या मुलभूत फरकामुळे मुस्लिमांच्या अन्य पंथातील अनुयायी अहमदियांना धर्मभ्रष्ट मानतात. स्टॉलवर असलेल्या व्यक्तींचा मात्र दावा होता, की अहमदिया पंथ हा शांती आणि सहजीवनासाठी प्रयत्नशील असलेला धर्म आहे. उस्मानाबादचे डॉ. बशरत अहमत यांचीही याच स्टॉलवर भेट झाली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवित्र पैगंबर हजरत मुहम्मद यांना अल्लाहने मुसलमानांवर येणाऱ्या परिस्थितीची माहिती पूर्वीच दिली होती. त्यापैकी एक भविष्यवाणी अशी होती, की मुसलमानांच्या मनातून ईश्वरीय निष्ठा निघून जाईल. ते मुसलमान म्हणून ओळखले गेले तरीही त्यांच्यात ईश्वरीय निष्ठेचा प्रकाश राहणार नाही. जेव्हा मुसलमानांची ईश्वरीय निष्ठा सुरैयावर (कृतिका नक्षत्राचा पुंजका) जाईल म्हणजेच ईश्वरीय निष्ठा मनातून फार दूरवर गेली असेल तेव्हा फारसी लोकांमधील एक व्यक्ती ती परत आणेल.
मिर्झा गुलाम अहमद कादियानी यांनी 1891 मध्ये असा दावा केला, की अल्लाहने त्यांना पवित्र पैगंबर हजरत मुहम्मद यांचे दास्यत्व आणि अनुनयासाठी अपेक्षित मसीहा आणि इमाम महदी म्हणून पाठविले आहे.  संपूर्ण जगाला इस्लाम धर्माचे खरा परिचय करून देणे आणि पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या शिरवणीकडे आणि पवित्र ईश्वरीय पुस्तक कुराणाकडे घेऊन जाणे, हा त्यांच्या आगमनाचा उद्देश होय, असा त्यांचा दावा होता. असे असले तरी पैगंबर हजरत मुहम्मद हेच खातमुलअंबिया (शेवटचे प्रेषित) आहेत आणि सर्वश्रेष्ठ आहेत, याबाबत त्यांनी निःसंदिग्ध शब्दांत ग्वाही दिली होती.
अहमदिया आणि अन्य मुसलमानांमधील आणखी एक फरक म्हणजे अहमदिया येशूला जीवंत मानत नाहीत. इस्लामी परंपरेनुसार येशू ख्रिस्त हाही प्रेषितच आहे, मात्र पैगंबर हजरत मुहम्मद हे शेवटचे आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित होत. मात्र ख्रिश्चन परंपरेनुसार येशू जीवंत असून तो निर्णयाच्या दिवशी (कयामत किंवा जजमेंट डे) परत येणार आहे. अहमदियांचे म्हणणे असे, की पैगंबर हजरत मुहम्मद हे सर्वश्रेष्ठ प्रेषित असल्यामुळे येशू त्यांच्यानंतर येऊ शकत नाही. एखादी व्यक्ती मेल्यानंतर ती जीवंत असण्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. सुळावर देण्याच्या घटनेनंतर येशू ख्रिस्त पॅलेस्टाईनमधून स्थलांतर करून काश्मीरमध्ये आले आणि श्रीनगरच्या मुहल्ला खानियारमध्ये त्यांची कबर आहे. ते कधीच आकाशात गेले नाहीत तर आकाशातून ते कसे अवतरणार, असा प्रश्न अहमदि विचारतात.
ही सगळी माहिती संमेलनाच्या त्या मांडवात आम्हाला मिळत होती. एवढे सगळे झाले, तरी पाकिस्तानात होणाऱ्या छळाबद्दल ही मंडळी फारशी बोलायला तयार नव्हती. कारण मुस्लिमांमध्ये जवळपास 53 पंथ-उपपंथ आहेत आणि त्या प्रत्येकाबद्दल कोणाला माहिती असायचे कारण नाही. अहमदियांबाबत थोडी फार माहिती होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या छळाच्या येणाऱ्या बातम्या. त्याबाबत माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. तरीही त्यांच्याशी गप्पा मारताना मजा आली. संमेलनाच्या त्या विस्तीर्ण मंडपात फेरफटका मारताना पाय दुखू लागले तरी त्याचे चीज झाल्यासारखे वाटले.
संमेलनातून बाहेर पडताना माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांची भेट झाली. शरद पवारांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला होता. त्याबाबत त्यांना छेडले तेव्हा सध्याची पद्धत बदलायला ते नाशूख दिसले. पाच जणांची समिती दिली तर त्यांच्या हातात सगळी सूत्रे जातील. त्यातून वेगळे राजकारण निर्माण होईल. त्यापेक्षा मतदारांची संख्या वाढायला हवी, असे त्यांचे मत पडले. शिवाय साहित्य परिषदेत साहित्यिक नसलेल्या लोकांची गर्दी झालीय, याबद्दलही त्यांचा फार काही आक्षेप दिसला नाही. एवढे मोठे आयोजन करायचे तर कार्यकर्ते लागणारच. मग आयोजनासाठी कार्यकर्ते लागतात तर साहित्य संस्थांमध्ये ते का नकोत, असा त्यांचा सवाल होता. यावेळी गंमतच झाली.
"आता हा मांडव तुम्ही पाहत आहात. येथे तुम्हाला किती साहित्यिक दिसतायत," कोत्तापल्लेंनी विचारले.
माझ्या तोंडून निघून गेले, "अगदी मोजकेच".
आपण हा प्रश्न विचारून चूक केली असे त्यांना बहुदा वाटले असावे. तितक्यात नको त्या शब्दांत बोलल्याचे माझ्याही लक्षात आले. म्हणून सावरण्यासाठी मी म्हणालो, "म्हणजे साहित्यिकांपेक्षा रसिकांची संख्या जास्तच आहे."
मग ते म्हणाले, "हा एवडा डोलारा उभा करायचा तर कार्यकर्त्यांची फौज लागतेच."

छातीवर डीपीयूचे बिल्ले लावलेले तरुण-तरूणी फिरत होते, त्याकडे बहुधा त्यांचा निर्देश असावा. मात्र अभावितपणे मी बोलून गेलो होतो. ते काही खोटे नव्हते. आपल्या गावात एक मोठा कार्यक्रम होत आहे. मोठ-मोठे लोक तिथे येताहेत आणि खूप काही पाहायला मिळणार, या भावनेने जमा झालेल्यांचीच तिथे गर्दी होती. त्यात साहित्यिक म्हणवून घेणारे किंवा साहित्याच्या आचेने आलेले होतेच कितीसे? केवळ पुस्तके आणि संतांची शिल्पे उभी केली म्हणजे साहित्यिक गुण येत नाहीत. हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या मैदानावर एक शुभ्र भपका दिसत होता. त्यात साहित्य कमी आणि सामग्रीच जास्त होती. त्याला कोणाचा काय इलाज? 

A photo posted by Devidas Deshpande (@devidasdesh) on

तिथेच एका ठिकाणी एक पुतळा होता. पुस्तकांचे ओझे पेलणाऱ्या मुलाचा हा पुतळा मला खूप अन्वर्थक वाटला. ज्ञान मिळालेय, पण ते पेलवत नाही, अशी काहीशी अवस्था मंडपाच्या आत प्रतिष्ठापना झालेल्यांची झाली होती. त्याचाच निदर्शक जणू हा पुतळा होता!

Thursday, February 4, 2016

संमेलनाच्या गर्दीला हव्या सेल्फ्या आणि कुल्फ्या!

(आधीचे भाग - दर साल दर शेकडा वादाचे संमेलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच बसलेली 'चपराक'!)


अशा परिस्थितीत कोण कुठल्या संमेलनाध्यक्ष झालेल्या सबनीसांच्या फिरत्या सत्यप्रियतेमुळे एवढ्या मोठ्या शाही आयोजनावर पाणी फिरणे पी. डी. पाटलांना परवडणारे नव्हते. त्यामुळे सबनीसांच्या सरबत्तीमुळे संमेलनाचे वस्त्रहरण होत आहे, असे दिसताच त्यांनी वाहिन्या आणि वृत्तपत्रे अशा दोन्ही मार्गांनी संमेलनाच्या प्रतिमेवरील धूळ झटकायचा प्रयत्न केला. ते शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी थेट सबनीसांचे कान टोचले. अन् तोपर्यंत सत्य आणि वैचारिकता या दोन इंजिनांवर धावणारी सबनीसांची गाडी अचानक ब्रेक घेऊन थांबली. कालपर्यंत एफ १ च्या स्पर्धेत भाग घेऊ पाहणारा मोटारचालक एकदम वडापची गाडी चालवू लागावा, अशी ही परिस्थिती होती. अन् या स्थितीला कारण ठरले ते स्वागताध्यक्ष हे अधिकृत पद असलेले मात्र खऱ्या अर्थाने संमेलनाचे कर्ते-करविते पी. डी. पाटील!
मागील स्वागताध्यक्षांकडून सध्याच्या स्वागताध्यक्षांना सूत्रे देण्याचा कार्यक्रम यंदाच्या संमेलनात पहिल्यांदा पाहण्यास मिळाला. सबनीस प्रकरणामुळे मात्र साहित्य संमेलनाची सूत्रे साहित्य महामंडळाकडून खऱ्या अर्थाने नवसंस्थानिकांकडे गेली. काही वाहिन्यांनी मंडपात आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेऊन त्यांना संमेलनाध्यक्षांचे नाव विचारले तेव्हा त्यांनी डी. पी. पाटील हेच सांगितले. यातच सर्व काही आले!



सबनीसांनी आपले छापील वाचन न वाचण्याचा मनसुबा आधीच जाहीर केल्यामुळे सर्वांनी आधीच निःश्वास सोडला होता. मात्र संमेलनाध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचे भाषण गाजण्याचीही एक उप-परंपरा मराठी जगतात आहे. लता मंगेशकर किंवा गिरीष कार्नाड यांची भाषणे त्यावेळच्या संमेलनाध्यक्षांपेक्षा गाजली होती. यावेळी गुलजार यांनी त्या परंपरेला नाट लागू दिली नाही. संमेलनाध्यक्षांच्या 'तिरडीचे बांबू' वगैरे अलंकृत शब्दांनी युक्त भाषणापेक्षा गुलजार यांचा तरल संवाद सगळ्यांना भावला, यात काहीही नवल नव्हते. माणसे केवळ भारंभार वाचून किंवा पुस्तके लिहून शहाणी होत नाहीत. त्यासाठी आणखी काहीतरी अंगी असावे लागते. ज्ञान धावते पण शहाणपण रांगते, अशी एक म्हण 'महाराष्ट्र वाक् संप्रदाय'मध्ये दिलेली आहे. ती अशावेळेस वारंवार आठवते.
मात्र उद्घाटनाच्या सत्रात खरी धमाल आणली ती शरद पवार यांनी. निवडणुका वगैरे प्रकार आमच्यासाठी सोडा, असा टोला देतानाच सबनीस निवडून येईपर्यंत मला त्यांचे नावही माहीत नव्हते, हेही त्यांनी सांगून टाकले. सबनीसांनी अध्यक्ष होण्यासाठी ज्या लांड्यालबाड्या केल्या त्याला हा एक प्रकारे दुजोराच होता. किमान शब्दांमध्ये समोरच्याचा पाणउतारा कसा करायचा, याचा तो वस्तुपाठच होता. दुसऱ्या दिवशी यशवंतरावांचे नाव घेऊन ज्या सुसंस्कृततेची भलामण त्यांनी केली, त्या सुसंस्कृततेचा हा एक अस्सल पुणेरी नमुना होता म्हटले तरी चालेल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तर 'बदनाम हुए तो क्या हुआ, नाम न हुआ' असा खास नागपुरी हिंदीतील संवाद ऐकवून संमेलनाध्यक्षांच्या अब्रूलाच हात घातला. (त्याचा वचपा आपल्या भाषणाच्या संबोधनात मुख्यमंत्र्यांचे नाव न घेऊन सबनीसांनी काढला.) शिवाय सबनीसांच्या भाषणाला न थांबून त्यांनी काहीही झाले तरी राजकारणी कसा भारी पडतो, याची चुणूक दाखवली.

उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आणि एकदा शरद पवारांची मुलाखत झाल्यावर संमेलनात अन्य काही कार्यक्रमांमध्ये कोणालाही रस असायचे कारण नव्हते. संमेलनातील परिसंवादांना उपस्थित राहणाऱ्या रसिकांची मानसिकता, अशा विषयावर कोणीतरी एकदा संशोधन करायला हवे. वर्षानुवर्षे तेच ते रटाळ आणि वांझोटे परिसंवाद घेऊनही आयोजकांचा उत्साह कमी का होत नाही, यावरही एखादा परिसंवाद व्हायला हवा. साहजिकच गावातील जत्रेला लोटावी तशी कुठून कुठून आलेली मंडळी संमेलनाच्या परिसरातील पुतळ्यांभोवती सहकुटुंब सेल्फ्या काढण्यात तरी गुंग होती किंवा खाद्यपदार्थांच्या मांडवात कुल्फ्या खाण्यात धन्यता मानत होती.

Sunday, January 31, 2016

अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच बसलेली 'चपराक'!

(आधीचा भाग - दर साल दर शेकडा वादाचे संमेलन)

हिंदुस्तान अँटिबायोटिक्स कंपनीच्या मैदानावर उभ्या केलेल्या शामियान्यात सुदैवाने यातील कुठल्याही घडामोडीचे प्रतिबिंब पडले नव्हते. नाना ठिकाणांहून आलेली मंडळी पुस्तके आणि खाद्य पदार्थांचा यथेच्छ समाचार घेत होती. खाद्य पदार्थांचा अंमळ जास्तच! एरवी या भव्य मंडपाच्या प्रवेशद्वारापासूनच त्याचा कर्ता करविता कोण याची सातत्याने आठवण करून देण्यात येत होती. चित्र आणि शब्दांच्या माध्यमातून 'डीपीयू' हे नाव पाहुण्यांच्या मन:चक्षूंवर कोरण्याची एकही संधी सोडलेली दिसत नव्हती.
डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने असलेले ग्रंथदालन असो किंवा संत तुकाराम वा संत ज्ञानेश्वरांचे पुतळे असे, त्यांच्या मागे कोणाचे अधिष्ठान आहे, हे स्पष्ट करण्यात काहीही कसर सोडली नव्हती. 
विशेष म्हणजे संमेलनाच्या मुख्य मांडवात शुद्ध साहित्यिक कार्यक्रमांनाही चांगली उपस्थिती होती आणि त्यात तरुणांची संख्या नजरेत भरण्यासारखी होती. अगदी कोणाला माहीत नसलेल्या परभाषक ज्ञानपीठ विजेत्या साहित्यिकांच्या मुलाखतींनाही रसिक खुर्च्यावर मांड ठोकून बसले होते. एरवी एकाच ठिकाणी जत्रेसारख्या मांडलेल्या दालनाऐवजी पुस्तकांची दोन दोन दालने होती आणि तिथेही बऱ्यापैकी गर्दी होती. (उगाच नाही कोट्यवधींच्या विक्रीचे आकडे साध्य होतात.)
याच दालनात एका ठिकाणी 'चपराक'चाही स्टॉल होता आणि सबनीसांचे पितळ उघडे पाडणाऱ्या लेखांचे अंक तिथे विक्रीला ठेवले होते. दुसऱ्या दिवशी आम्ही गेलो तेव्हा या स्टॉलवरून 'चपराक'चे अंक उचलून नेण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रयोग झाला होता. त्यावेळी या स्टॉलवर एकच व्यक्ती होती आणि त्यालाही हे अंक का नेण्यात येत आहेत, याची माहिती देण्यात आली नाही.
सुदैवाने या घटनेची माहिती 'झी24तास' ने सर्वात आधी दिली. त्यानंतर या कृत्याचा बोभाटा झाला आणि ज्यांनी अंक उचलून नेले, त्यांनीच ते आणून ठेवले. मात्र या दरम्यान जायची ती अब्रू गेलीच होती. 'बूंद से गई वह हौद से नहीं आती,' हे कोट्यवधीचा खर्च केल्याने लक्षात येऊच शकत नाही. कारण सुसंस्कृतता आणि उदारमतवाद या काही विकत घेण्याच्या गोष्टी नाहीत. त्या मुळातच असाव्या लागतात.
एकूणच संमेलनाध्यक्षांनी संपूर्ण जत्रेत कॅमेरे आपल्यावर रोखलेले राहतील, याची तजवीज केली होती. त्यामुळे उद्घाटनाच्या सत्राकडे सर्वांचे लक्ष राहिले होते. परंतु या कार्यक्रमात काही होणारच नाही, हे ठरलेलेच होते. कारण सबनीसांनी माफी मागितली ती मुळात भाजपच्या विरोधाला घाबरून नक्कीच नव्हती मागितली. सबनीसांचे काहीही वाकडे करण्याच्या परिस्थितीत भाजप नव्हता. केंद्रात आणि  राज्यात दोन्हीकडे भाजपचे सरकार. त्यात दोन्ही सरकारांनी देशातील सांस्कृतिक वातावरण गढूळ केल्याचे आरोप होतच आहेत. जरा कुठे त्यातून उसंत मिळाली, की हे नवे लचांड कोण मागे लावून घेणार? नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'बाजीराव मस्तानी'च्या वेळेस हे दिसलेच होते. सरड्याची धाव कुंपणापर्यंत! शिवाय भाजप कार्यकर्त्यांनी कितीही जोर-बैठका काढल्या तरी ते शिवसेना किंवा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पासंगालाही पुरणार नाहीत.  त्यामुळे त्या आघाडीवर भाजपचे भय बाळगण्याची काडीचीही गरज सबनीसांना किंवा ते एक वर्ष भर ज्यांचे मांडलिक असतील, त्या साहित्य महामंडळाला नाही.
हां, असे होऊ शकते, की भाजपची मंडळी नाराज झाली तर सरकार दरबारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आपली कामे करून घेताना तोशीस पडेल. अन् हीच फार मोठी आपत्ती होती. कारण साहित्य परिषद काय किंवा साहित्य महामंडळ काय, त्यांची साहित्य सेवा चालणार सरकारी सहकार्याने. कोणीतरी हिकमती कार्यकर्ता, होतकरू 'राजमान्य राजश्री' पकडायचा, त्याच्या मार्फत दुबई, अंदमान, पंजाब अशा साहित्य सेवेच्या वाऱ्या काढायच्या, स्थानिक शासनाकडे संस्कृती संवर्धनाची गळ घालायची आणि चार दिवस मौजमजा करून मराठीचे भले करायचे...हे एवढे काम करायचे तर सत्तेतील सरकारशी वैर घेऊन चालत नाही.
अमेरिकेने इराकमधील युद्धाच्या वेळी एम्बेडेड जर्नलिझम (अंकित पत्रकारिता) ही संकल्पना आणली होती. मराठी साहित्य विश्वाने ही संकल्पना खूप आधी पचवली होती. म्हणूनच कृषिमंत्री असताना लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या मुकाट पाहणारा नेता यांना जाणता राजा वाटतो. दर वर्षाआड ज्याचे कार्यकर्ते किमान एका वृत्तपत्राचे कार्यालय फोडतात तो नेता यांना रसिक वाटतो. तुकड्यांवर पोसलेल्यांना सत्ताधीशांची नाराजी पेलवत नाही. सरकारी जीआरनुसार लेखनाच्या रांगोळ्या घालून शारदेची सेवा करणाऱ्यांना म्हणूनच सत्ताधारी पक्षाशी पंगा घेता येत नाही. दुर्गा भागवत किंवा पु. ल. देशपांडे अशी नावे एक आपद्धर्म म्हणून घ्यायची. एरवी 'परस्परं प्रशंसन्ति अहो रुपं अहो ध्वनि:' च्या सोहळ्यांचीच संख्या जास्त. 


अन् आतापर्यंत मराठी शारदेच्या प्रांगणात जो जल्लोष सरकारी कृपेने चालला होता, तोच जल्लोष पुढे चालू ठेवण्यासाठी, त्यात आणखी रंगढंग उधळण्यासाठी नवसंस्थानिकांची मदत घेणे आवश्यक बनले आहे. आता तुमच्या संस्कृतीचे चोचले पुरविण्यासाठी जे आपल्या पदराला खार लावणार आहेत, त्यांनी प्रत्येक दाम वाजवून न घेतला तरच नवल. शेवटी मराठी संस्कृतीची जपणूक करण्याच्या नावाखाली माजी  संमेलनाध्यक्षांना भिक्षावळ घालण्यासाठी कोणी शिक्षणसंस्था काढत नाही का मसाल्याचे कारखाने चालवत नाही. म्हणूनच मग संमेलनाच्या प्रांगणात संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांच्या पुतळ्यांच्या बरोबरीने 'डीपीयू'चे फलक लागले तरी ते कानाडोळा करण्याशिवाय पर्याय नाही.